मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) दररोज तब्बल १७ कोटी सायबर हल्ल्यांचा सामना करत आहे. तरीदेखील, व्यवहार विनाअडथळा सुरू राहावेत, यासाठी ‘सायबर योद्ध्यांची’ टीम २४ तास कार्यरत असते, असे एनएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान एका दिवशी सर्वाधिक ४० कोटी सायबर हल्ले एनएसईवर झाले होते. परंतु, अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे प्रणालीवर कोणताही परिणाम झाला नाही. आमच्या तांत्रिक टीम आणि विशेष सॉफ्टवेअरमुळे हे हल्ले निष्फळ ठरतात, असे एनएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
काय काळजी घेतली जाते?
एनएसईकडे दोन प्रमुख सायबर सुरक्षा केंद्रे आहेत. दोन्ही केंद्रांतील तांत्रिक पथके सतत कार्यरत असतात. ई-मेल, बाह्य डेटा, पेन ड्राइव्ह आणि डीडीओएस हल्ल्यांपासून संरक्षणासाठी कडक प्रोटोकॉल आहेत. संशयास्पद हालचालींची नोंद होताच तत्काळ अलर्ट आणि पॉप-अप संदेश जारी केले जातात.
नेमका कसा होतो हल्ला? -
डीडीओएस हल्ल्यात सर्व्हरवर अनेक स्रोतांमधून ट्रॅफिक वाढवले जाते, ज्यामुळे सर्व्हर क्रॅश होतो किंवा वापरकर्त्यांना उपलब्ध होत नाही.
अशा संकटांना मात देण्यासाठी चेन्नई येथील मुख्यालयातून नियंत्रित करणारी स्वयंचलित डिजिटल बॅकअप प्रणाली एनएसईकडे आहे.
मानवी हस्तक्षेपाशिवाय ही प्रणाली त्रुटी आपोआप दुरुस्त करते. मुख्य सर्व्हरमध्ये अडथळा आल्यास चेन्नईतील बॅकअप काही मिनिटांत सक्रिय होते.