लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली. मात्र, आगामी वर्षात कमी कपातीचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार काेसळले. गुरुवारी सेन्सेक्स ९६४ अंकांनी तर, निफ्टी २४७ अंकांनी काेसळले. चालू आठवड्यात सलग चाैथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार काेसळले. सेन्सेक्स २,९१५ अंकांनी काेसळला आहे. या घसरणीमुळे सुमारे १० लाख काेटी रुपयांचे नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे.
अमेरिकेत ०.२५ टक्के व्याजदरात कपातीची घाेषणा बुधवारी करण्यात आली हाेती. भारतातही महागाई कमी हाेताना दिसत आहे. त्यामुळे या कपातीचे सकारात्मक परिणाम हाेतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, अमेरिकेने भविष्यात व्याजदर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेराेम पाॅवेल यांनी सांगितले. या भूमिकेमुळे जगभरातील शेअर बाजार काेसळले.
सेन्सेक्स ८० हजारांखाली
अमेरिकेतील निर्णयामुळे सेन्सेक्स गुरुवारी ८० हजारांच्या पातळीखाली आला. बँका, धातू आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. नाेव्हेंबर महिन्यात सेन्सेक्स ७७ हजारांपर्यंत घसरला हाेता. त्यानंतर सेन्सेक्सने पुन्हा ८२ हजारांपर्यंतचा टप्पा गाठला हाेता. १,३१६.८१ काेटी रुपयांचे शेअर्स परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी विकले.
घसरणीची पाच प्रमुख कारणे
- अमेरिकेने नव्या वर्षात व्याजदर स्थिर ठेवण्याचे संकेत दिले.
- डाॅलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी ८५.०८ रुपयांपर्यंत घसरण.
- परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कायम.
- प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल निराशाजनक राहिले.
- भूराजकीय तणावामुळे शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
सेन्सेक्सची घसरण
१३ डिसेंबर ८२,१३३
१६ डिसेंबर ८१,७४८
१७ डिसेंबर ८०,६८४
१८ डिसेंबर ८०,१८२
१९ डिसेंबर ७९,२१८