लॉस एंजिल्समध्ये एका सर्वसामान्य घरात राहणाऱ्या मॅथ्यू गेलगर या तरुणाने असं काही करून दाखवलं ज्याची भविष्यवाणी ओपन AI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी केली होती. ना आलिशान ऑफिस, ना शेकडो कर्मचाऱ्यांची फौज आणि ना कुठलीही जबरदस्त फंडिंग याशिवाय गेलगरने केवळ एआयच्या माध्यमातून स्वत:चं कौशल्य दाखवून उद्योग जगतात खळबळ उडवून दिली आहे. मॅथ्यू गेलगरने त्याची कंपनी मेडवी(Medvi) अवघ्या २० हजार डॉलर म्हणजे १८.५ लाखात सुरू केली. मॅथ्यूचं टेलीहेल्थ ऑनलाइन प्लॅटफॉर्म वजन कमी करणारे औषध विक्री करते.
सप्टेंबर २०२४ मध्ये सुरूवात झालेल्या या कंपनीने फक्त २ वर्षात २०२६ मध्ये १६७०० कोटींची वार्षिक उलाढाल केली आहे. १८ लाखांची गुंतवणूक करून मॅथ्यू गेलगर आज २८ कोटींची कमाई करत आहे. या कंपनीत मॅथ्यूसोबत त्याचा भाऊ काम करतो. द न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्टनुसार, मेडवी या कंपनीने पहिल्याच महिन्यात ३०० ग्राहक जोडले आणि दुसऱ्या महिन्यापर्यंत हा आकडा एक हजारापर्यंत पोहचला. २०२५ मध्ये कंपनीने वार्षिक वर्षात ४०.१ कोटी डॉलर(३७०० कोटी) विक्री केली होती. त्यावर १६.२ टक्के म्हणजे ६०० कोटींचा नफा कमावला. जो या क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिम्सच्या तुलनेत ५.५ टक्के अधिक आहे.
सॅम ऑल्टमॅन यांची भविष्यवाणी खरी ठरली
ओपन AI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी २०२४ साली एक भविष्यवाणी केली होती. लवकरच एआयच्या मदतीने एकटा माणूसही १ अब्ज डॉलर कंपनी उभा करू शकतो. मॅथ्यू गेलगरच्या या कारनाम्याने ही भविष्यवाणी खरी ठरली. माझी सर्वात मोठी ताकद वेगाने निर्णय घेणे ही आहे. जिथे मोठ्या कंपन्या मिटिंग्स आणि ईमेलच्या जाळ्यात अडकतात तिथे गेलगरने एआयच्या मदतीने अनेक मोठे निर्णय काही क्षणात घेतले होते.
१२ AI टूल्स सांभाळतात बिझनेस
मेडवी कंपनीचा पूर्ण पाया एआयच्या भरवशावर आहे. गेलगर एकटाच पूर्ण कॉर्पोरेट टीमसारखे काम करतो कारण त्याच्याकडे अनेक एआय असिस्टेंट आहेत. कोडिंगसाठी त्याने ChatGPT, क्लाउड आणि ग्रोकचा सहारा घेतला आहे. जाहिरातींसाठी क्रिएटिव्ह आणि व्हिडिओ बनवायला मिडजर्नी आणि रनवे टूल्सचा वापर करतो. ग्राहकांशी बोलण्यासाठी ElevebLabs च्या माध्यामतून एआय व्हॉईस ओव्हर सिस्टम बनवला आहे. इतकेच नाही तर गेलगरने त्याच्या आवाजात एआय क्लोनही बनवला आहे. औषधांची डिलिव्हरी आणि डॉक्टर नेटवर्कसाठी ऑप्लमसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.
कंपनीत एकमेव कर्मचारी
या मल्टी मिलियन डॉलर कंपनीत मॅथ्यू गेलगारशिवाय केवळ एकच कर्मचारी काम करतो. तो म्हणजे मॅथ्यूचा छोटा भाऊ एलियट, एलियटचे काम एखाद्या मॅनेजरसारखे नाही तर फिल्टरसारखे आहे. तो भावापर्यंत पोहचणारे कॉल्स आणि मेसेज थांबवण्याचे काम करतो जेणेकरून मॅथ्यू पूर्ण लक्ष त्याच्या बिझनेसकडे देऊ शकेल. आज मेडवी कंपनी ३० लाख डॉलर म्हणजे २८ कोटींची कमाई करत आहे. परंतु गेलगरने ही कमाई फक्त स्वत:साठी ठेवली नाही तर त्याच्या कंपनीतील नफ्याचा मोठा वाटा बेरोजगार युवकांच्या मदतीसाठी आणि पशु कल्याणासाठी दान करण्यात जातो.
