How multi asset funds reduce risk : शेअर बाजारातील अनिश्चितता आणि सोन्या-चांदीचे कडाडलेले भाव या पार्श्वभूमीवर, २०२५ हे वर्ष 'मल्टी अॅसेट अलोकेशन फंड्स'साठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. 'एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका' या गुंतवणुकीच्या सुत्राला अनुसरून चालणाऱ्या या फंडांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले असून, फ्लेक्सी-कॅप फंडांच्या तुलनेत पाचपट अधिक परतावा दिला आहे.
काय आहेत 'मल्टी अॅसेट' फंड?
हे फंड प्रामुख्याने तीन किंवा अधिक मालमत्ता प्रकारांमध्ये गुंतवणूक करतात. यात शेअर्स, कर्जरोखे आणि सोने-चांदी यांचा समावेश असतो. बाजारातील परिस्थितीनुसार कोणता घटक जास्त नफा देईल, हे ओळखून फंड मॅनेजर त्यातील गुंतवणूक कमी-जास्त करतात. यामुळे जोखीम कमी होऊन परताव्याची शक्यता वाढते.
२०२५ मधील कामगिरी
गेल्या वर्षात शेअर बाजारात मोठी अस्थिरता असतानाही मल्टी अॅसेट फंडांनी सरासरी १६% नफा दिला. याउलट, गुंतवणूकदारांचे आवडते फ्लेक्सी-कॅप फंड केवळ ३% परतावा देऊ शकले. या यशामागे सोन्या-चांदीतील तेजीचा मोठा वाटा आहे. सोन्यामध्ये ७४.५% वाढ झाली. तर चांदीने १३८% इतकी झेप घेतली.
संतुलित रणनीती ठरली सरस
२०२५ मधील आकडेवारीनुसार, ज्यांनी सर्व मालमत्तांमध्ये समतोल राखला, त्यांना सर्वाधिक फायदा झाला.
- संतुलित पोर्टफोलिओ : २८.४% परतावा.
- इक्विटी प्रधान पोर्टफोलिओ (७०% शेअर्स) : १२.९% परतावा.
- सोने नसलेला पोर्टफोलिओ : केवळ ६.३% परतावा.
२०२६ साठी काय आहे अंदाज?
२०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम राहण्याची शक्यता आहे. व्याजाच्या दरात मोठी कपात होण्याची चिन्हे नसल्यामुळे 'हायब्रीड' आणि 'अॅसेट अलोकेशन' फंड पोर्टफोलिओला स्थिरता देण्यासाठी आवश्यक ठरतील. दीर्घकालीन विचार केल्यास (१० वर्षे), या फंडांनी सरासरी १२.७% परतावा दिला आहे, जो पूर्णपणे इक्विटी असलेल्या फंडांच्या (१२.८%) जवळपास आहे.
बाजारातील प्रमुख पर्याय
जर तुम्हाला या प्रकारच्या फंडात गुंतवणूक करायची असेल, तर खालील काही प्रमुख फंड हाऊसचे पर्याय उपलब्ध आहेत.
बड्या कंपन्या : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एसबीआय, एचडीएफसी, निप्पॉन इंडिया, अॅक्सिस, कोटक.
इतर पर्याय : क्वांट, टाटा, यूटीआय आणि मिराई अॅसेट.
वाचा - '५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
