SIP Top-Up Guide : कोविडनंतर म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. दीर्घकाळात जोखीम कमी करुन मोठा निधी जमा करण्यासाठी ही योजना उत्तम मानली जाते. एसआयपीमध्ये आपण दरमहा थोडी-थोडी रक्कम गुंतवतो. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा फायदा मिळतो आणि गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी होते. पण, कधी कधी तुमच्याकडे अधिक रक्कम जमा होते किंवा तुमचा पगार वाढतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या एसआयपीची रक्कम वाढवू शकता. यालाच 'एसआयपी टॉप-अप' किंवा 'एसआयपी बूस्टर' असे म्हणतात.
SIP टॉप-अप म्हणजे काय?
टॉप-अप एसआयपी सुविधेअंतर्गत, गुंतवणूकदार त्यांच्या सध्याच्या एसआयपीमधील मासिक योगदान वाढवू शकतात. जर एखादा गुंतवणूकदार सध्या १०,००० रुपये दरमहा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवत असेल आणि त्याला जास्त गुंतवणूक करायची असेल, तर तो SIP टॉप-अपचा पर्याय निवडू शकतो. या सुविधेमुळे गुंतवणूकदार प्रत्येक आर्थिक वर्षानंतर किंवा दर सहा महिन्यांनी आपली गुंतवणुकीची रक्कम स्वयंचलितपणे वाढवू शकतात. सामान्य एसआयपीमध्ये रक्कम वाढवण्यासाठी नवीन एसआयपी सुरू करावी लागते. याउलट, टॉप-अप एसआयपी तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन एसआयपी सुरू करण्याच्या त्रासापासून वाचवते आणि उत्पन्न वाढल्यावर गुंतवणूक वाढवण्याचे स्वातंत्र्य देते.
SIP टॉप-अपचे मोठे फायदे
- ही सुविधा गुंतवणुकीची रक्कम वाढवत असल्यामुळे, गुंतवणूकदार त्यांचे आर्थिक लक्ष्य अपेक्षित वेळेपेक्षा लवकर पूर्ण करू शकतात.
- वाढत्या महागाईच्या काळात, ही सुविधा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची खरी किंमत टिकवून ठेवण्यास मदत करते आणि दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी देते.
- ही सुविधा ऑटो-पायलट मोडमध्ये काम करते. जर तुमची निवडलेली स्कीम चांगला परतावा देत असेल, तर तुम्ही त्याच स्कीममध्ये आपोआप जास्त गुंतवणूक करून अधिक लाभ मिळवू शकता.
- या सुविधेमुळे गुंतवणूकदाराला वेळेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक वाढवण्यास मदत होते.
टॉप-अप एसआयपी सुरू करण्यापूर्वी काय लक्षात घ्यावे?
- टॉप-अपची रक्कम (उदा. १०% वाढ किंवा किमान ₹५००) आणि कालावधी (उदा. दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा) आधीच निश्चित करावा लागतो.
- तुम्ही टॉप-अपची कमाल मर्यादा देखील निश्चित करू शकता, त्यानंतर टॉप-अप थांबेल.
- एकदा ही सुविधा सुरू केल्यानंतर, त्यात वारंवार बदल करणे सोपे नसते.
- जर भविष्यात तुम्ही वाढवलेली रक्कम भरू शकला नाही, तर तुम्हाला ही योजना रद्द करावी लागेल आणि पुन्हा नवीन एसआयपी सुरू करावी लागेल. त्यामुळे वाढलेली रक्कम भविष्यात सहज भरता येईल, याची खात्री करूनच ही सुविधा निवडावी.
वाचा - तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठे आर्थिक विधेयक संसदेत होणार सादर
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
