SIP Investment : आजकाल लोक आर्थिक नियोजनाबाबत जागरुक झाली आहेत. नोकरीला लागल्यानंतर गुंतवणुकीपासून निवृत्तीपर्यंतचे नियोजन करत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधत आहे. अशा परिस्थितीत, एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अत्यंत लोकप्रिय झाला आहे. पण, मोठा निधी उभारण्यासाठी फक्त एसआयपी माहिती असून फायदा नाही. तुम्हाला याचा योग्य वापर करता यायला हवा.
या माध्यमातून तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करून दीर्घकाळात आपला पैसा वाढवू शकता. म्युच्युअल फंड उद्योगाची व्यापार संस्था असलेल्या AMFI च्या ताज्या आकडेवारीनुसार, मासिक एसआयपीचा ओघ लवकरच ३०,००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये हा प्रवाह २५,३२३ कोटी रुपये होता. सध्या एसआयपी ॲसेट्स इंडस्ट्रीच्या एकूण ॲसेट्सच्या सुमारे २०% आहेत.
एसआयपीचे फायदे आणि गुंतवणुकीचे प्रकार
एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्याची सुरुवात फक्त १०० रुपयांपासून करू शकता. फंडच्या नियम आणि अटींनुसार गुंतवणूकदार आपले पैसे कधीही काढू शकतात. यासाठी एक्झिट लोड लागू होऊ शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत: एसआयपी आणि एकरकमी. ज्यांच्याकडे मोठी एकरकमी रक्कम नसते, ते एसआयपीद्वारे दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवून मोठा निधी तयार करतात.
डेली एसआयपी म्हणजे काय?
डेली एसआयपी ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक प्रक्रिया आहे, ज्यात प्रत्येक ट्रेडिंग दिवशी एक निश्चित रक्कम गुंतवली जाते. ही नियमित (मासिक) एसआयपीपेक्षा वेगळी आहे. डेली एसआयपीमध्ये, एक निश्चित रक्कम (उदा. ₹१००) प्रत्येक कामकाजाच्या दिवशी तुमच्या निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेत आपोआप गुंतवली जाते.
डेली आणि मासिक एसआयपी
डेली एसआयपी : यामध्ये तुम्ही दर महिन्याला मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी, बाजाराच्या कामकाजाच्या प्रत्येक दिवशी (साधारणपणे महिन्यात २० ते २२ दिवस) छोटी रक्कम (उदा. ₹१००) गुंतवता. अशाप्रकारे, एका महिन्यात अंदाजे २,२०० रुपये जमा होतात.
मासिक एसआयपी : यामध्ये तुम्ही दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला ३,००० रुपयांची मोठी रक्कम गुंतवता.
दोन्हीमध्ये मुख्य फरक म्युच्युअल फंड युनिट्सच्या खरेदीच्या दिवशी असलेल्या नेट ॲसेट व्हॅल्यूवर आधारित असतो.
डेली एसआयपी मध्ये तुम्हाला बाजाराच्या सरासरी किमतीचा अधिक फायदा मिळतो, कारण वेगवेगळ्या किंमतींवर युनिट्स खरेदी होतात. त्यामुळे बाजारात मोठी अस्थिरता असताना डेली एसआयपी थोडी जास्त सुरक्षित मानली जाते. मासिक एसआयपीमध्ये एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात युनिट्स खरेदी होतात, ज्यामुळे बाजारातील चढ-उताराचा परिणाम जास्त होऊ शकतो.
वाचा - रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
दोन्ही पद्धती प्रभावी असल्या तरी, अधिक अस्थिर बाजारात डेली एसआयपी 'सरासरी'चा फायदा देऊन चांगला परतावा देऊ शकते, पण त्यासाठी जास्त प्रशासकीय प्रक्रिया लागते. स्थिर बाजारात मासिक एसआयपी सोयीस्कर आणि जास्त प्रचलित आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
