Mutual Fund : गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी आणि म्युच्युअल फंड प्रक्रियेत अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी बाजार नियामक संस्था 'सेबी'ने महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. यानुसार, म्युच्युअल फंडातील 'सोल्यूशन ओरिएंटेड' ही श्रेणी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी अधिक प्रगत 'लाईफ सायकल फंड' ही नवीन श्रेणी सुरू केली जाणार आहे.
कोणती श्रेणी बंद होणार?
म्युच्युअल फंडाच्या मुख्य ५ विभागांपैकी 'सोल्यूशन ओरिएंटेड स्कीम्स' आता इतिहासजमा होतील. या श्रेणीमध्ये सध्या एकूण ४१ स्कीम्स कार्यरत असून त्यांचे एकूण मालमत्ता व्यवस्थापन ५७,२७४ कोटी रुपये इतके आहे. यामध्ये प्रामुख्याने २९ निवृत्ती फंड आणि १२ चिल्ड्रन्स फंडांचा समावेश आहे.
'लाईफ सायकल फंड' काय आहे?
सेबीने सुरू केलेला 'लाईफ सायकल फंड' हा 'टार्गेट डेट फंड' म्हणून ओळखला जाईल. सुरुवातीच्या काळात या फंडातील जास्तीत जास्त पैसा 'इक्विटी'मध्ये (शेअर्स) गुंतवला जाईल. जशी गुंतवणुकीची मुदत जवळ येईल, तसा या फंडाचा कल आपोआप 'डेट फंडा'कडे (सुरक्षित गुंतवणूक) वळवला जाईल, जेणेकरून गुंतवणूकदारांचे भांडवल सुरक्षित राहील. यामध्येच निवृत्ती आणि चिल्ड्रन्स फंडांचा समावेश असेल.
फंड ऑफ फंड्स आणि पारदर्शकतेबाबत नवीन नियम
फंड ऑफ फंड्स (FOF) या प्रकारातही सेबीने कडक निर्बंध लादले आहेत: आता FOF फंड्सना त्यांच्याकडील किमान ९५% रक्कम मुख्य फंडामध्ये गुंतवणे अनिवार्य असेल. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांवर किती प्रमाणात FOF लाँच करायचे, याबाबत आता मर्यादा असेल. गुंतवणूकदारांना स्पष्टता मिळावी म्हणून फंड मॅनेजरला आता 'पोर्टफोलिओ ओव्हरलॅप'ची माहिती देणे बंधनकारक असेल. फंडाचे नाव त्याच्या श्रेणीनुसारच असणे आता आवश्यक आहे.
वाचा - भारताच्या एका निर्णयाने जागतिक तेल बाजारात 'प्राईस वॉर'चा भडका! समुद्रात तेलवाहू जहाजांच्या रांगा
कधीपासून लागू होणार नियम?
सेबीच्या परिपत्रकानुसार, हे सर्व नवीन नियम पुढील ६ महिन्यांत लागू केले जातील. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या भविष्यातील उद्दिष्टांनुसार योग्य फंडाची निवड करणे अधिक सोपे होणार आहे.
