Radhika Gupta :म्युच्युअल फंडातगुंतवणूक करताना अनेकजण केवळ मागील एक वर्षाचा परतावा पाहून निर्णय घेतात. मात्र, गुंतवणुकीचा हा शॉर्टकट भविष्यात धोकादायक ठरू शकतो, असा इशारा 'एडलवाइज म्युच्युअल फंड'च्या सीईओ राधिका गुप्ता यांनी दिला आहे. केवळ 'सॉर्टिंग' किंवा रँकिंग पाहून गुंतवणूक करणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून चालण्यासारखे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मागील परतावा म्हणजे भविष्याची खात्री नव्हे!
राधिका गुप्ता यांच्या मते, इक्विटी फंडांची मागील एक वर्षातील कामगिरी ही भविष्यात तसाच परतावा मिळेल याची कोणतीही गॅरंटी देत नाही. एखादा फंड एका वर्षात चमकू शकतो, पण तो बाजारातील सर्व चढ-उतारांमध्ये टिकून राहीलच असे नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी फंडाच्या दीर्घकालीन वर्तणुकीवर लक्ष देणे आवश्यक आहे.
'रोलिंग रिटर्न' : गुंतवणुकीचा खरा कस
फंडाची खरी ताकद ओळखण्यासाठी राधिका गुप्ता यांनी 'पाच वर्षांचा रोलिंग रिटर्न' हा सर्वात विश्वसनीय मार्ग असल्याचे सांगितले. एका ठराविक कालावधीसाठी (उदा. ५ वर्षे) वेगवेगळ्या तारखांना फंडाने किती परतावा दिला, याची सरासरी म्हणजे रोलिंग रिटर्न. यामुळे फंडाची सातत्यपूर्ण कामगिरी समजते. केवळ एका चांगल्या वर्षावर विसंबून न राहता, फंड किती वेळा यशस्वी झाला आहे हे यातून स्पष्ट होते.
फंडाचा आढावा कसा घ्यावा?
- राधिका गुप्ता यांनी फंड रिव्ह्यू करण्यासाठी स्वतःची पद्धत सांगितली आहे.
- फंडाने त्याच्या बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली आहे, हे पाहावे.
- रोलिंग रिटर्नमध्ये फंडाने किमान किती आणि कमाल किती परतावा दिला आहे, याचा अभ्यास करावा.
- या आकड्यांवरून फंड मॅनेजर किती अचूक प्रक्रियेचे पालन करतो आणि सातत्य राखतो, हे लक्षात येते.
Stop being a sorting investor!
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) January 6, 2026
We have consistently been talking about the problems of scanning a list of funds by last 1 year rank and making decisions, so I am happy to see this article and discussion. The last 1 year’s performance is a dangerous and unreliable metric of… pic.twitter.com/KkE4x2vuYE
गुंतवणूकदारांसाठी सुविधा
अनेक म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर गुंतवणूकदारांना तीन आणि पाच वर्षांचे रोलिंग रिटर्न्स पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे गुंतवणूकदारांना दोन वेगवेगळ्या फंडांची अधिक प्रभावीपणे तुलना करता येते. इतर गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सनी देखील केवळ वार्षिक परताव्याऐवजी 'रोलिंग रिटर्न'सारखे मापदंड दाखवावेत, अशी अपेक्षा गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
