Mutual Fund KYC: आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं आणखी सोपं झालंय. टपाल विभाग देशभरातील त्यांच्या १.६४ लाखांहून अधिक टपाल कार्यालयांद्वारे केवायसी (Know Your Customer) सेवा सुरू करणार आहे. टपाल विभागाचे कर्मचारी तुमच्या केवायसी प्रक्रियेत पूर्ण मदत करतील आणि आवश्यक कागदपत्रं थेट म्युच्युअल फंड कंपन्यांना पोहोचवतील. टपाल विभागानं असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) सोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे, ज्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची KYC प्रक्रिया सुलभ होणारे.
याचा अर्थ असा की जर तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही आता पोस्ट ऑफिसमधूनच तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. पोस्ट ऑफिसचे कर्मचारी तुम्हाला तुमचा केवायसी फॉर्म भरण्यास मदत करतीलच पण तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून ते असेट मॅनेजमेंट कंपन्यांना (AMC) पाठवतील. केवायसी नोंदणी एजन्सीजच्या नोंदींमध्ये गुंतवणूकदारांचा डेटा व्हॅलिडेट करता यावा यासाठी एएमएफआय त्यांच्या सर्व सदस्य एएमसींच्या वतीनं हा उपक्रम पुढे नेईल.
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
KYC म्हणजे काय?
केवायसी म्हणजे (Know Your Customer) 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या'. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही बँक, म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही वित्तीय सेवेकडून कोणतीही आर्थिक सेवा घेता तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतात. जसं की - ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) आणि पत्त्याचा पुरावा (जसं की वीज बिल, रेशन कार्ड इ.). या कागदपत्रांवरुन तुम्ही कोण आहात आणि कुठे राहता याची माहिती मिळते. कोणताही चुकीचा किंवा फसवा व्यक्ती या प्रणालीचा गैरवापर करू नये म्हणून ही प्रक्रिया आवश्यक आहे. केवायसीमुळे तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि सरकारनं बनवलेल्या नियमांचंही पालन केलं जात आहे याची खात्री होते.
फंडाची केवायसी स्थिती कशी तपासायची?
जर तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाची केवायसी स्थिती तपासायची असेल, तर प्रथम त्या म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर किंवा तुम्ही जिथे गुंतवणूक केली आहे त्या वेबसाइटवर जा. तिथे तुम्हाला केवायसी स्टेटस तपासण्याचा पर्याय मिळेल. त्यामध्ये तुमचा १० अंकी पॅन क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला कळेल की तुमची केवायसी स्थिती व्हॅलिडेट आहे किंवा नाही किंवा प्रोसेसमध्ये आहे किंवा ती रिजेक्ट करण्यात आलीये, याचीही माहिती मिळेल. ही पद्धत खूप सोपी आहे आणि तुम्ही घरी बसून तुमची स्थिती तपासू शकता.