२०×१२×२० SIP Rule: आजच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की, भविष्यासाठी आपल्याकडे एक मोठा निधी असावा, ज्यामुळे निवृत्ती, मुलांचं शिक्षण किंवा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही. मात्र, कोट्यधीश होण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो, असा विचार करून बहुतांश लोक गुंतवणुकीपासून दूर राहतात. आर्थिक सल्लागारांच्या मते, हे पूर्णपणे चुकीचं आहे. योग्य नियोजन आणि शिस्तीच्या जोरावर छोटी रक्कम देखील तुम्हाला करोडपती बनवू शकते. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे २०×१२×२० SIP नियम.
काय आहे २०×१२×२० SIP नियम?
हा नियम समजून घेणं अत्यंत सोपं आहे. यामध्ये पहिल्या २० चा अर्थ आहे दरमहा २०,००० रुपयांची गुंतवणूक, १२% चा अर्थ आहे वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा आणि शेवटच्या २० चा अर्थ आहे गुंतवणुकीचा २० वर्षांचा कालावधी. म्हणजेच, जर तुम्ही दरमहा २०,००० रुपयांची एसआयपी (SIP) केली आणि तुम्हाला दीर्घकाळात सरासरी १२% परतावा मिळाला, तर २० वर्षांनंतर तुमच्याकडे एक मोठा निधी तयार होऊ शकतो.
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
किती गुंतवणूक आणि किती निधी तयार होईल?
जर तुम्ही दरमहा २०,००० रुपयांची एसआयपी केली, तर २० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक ४८ लाख रुपये होईल. याच ठिकाणी चक्रवाढ व्याजाची जादू काम करते. वार्षिक १२% परताव्याच्या हिशोबात, २० वर्षांनंतर तुमचा हा निधी सुमारे १.९ कोटी ते २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ असा की, तुम्ही जरी ४८ लाख रुपये गुंतवले असले, तरी वेळ आणि चक्रवाढ व्याजाच्या ताकदीमुळे हा पैसा चार पटींहून अधिक वाढू शकतो.
आर्थिक सल्लागार काय म्हणतात?
आर्थिक सल्लागारांच्या मते, एसआयपीची सर्वात मोठी ताकद म्हणजे शिस्त आणि वेळ. बाजार कधी वर जातो तर कधी खाली येतो, परंतु दीर्घ कालावधीत इक्विटी म्युच्युअल फंड्सनी सरासरी १२% च्या आसपास परतावा दिला आहे. एसआयपी केल्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा परिणाम देखील कमी होतो. गुंतवणूक करताना एसआयपी दीर्घकाळ सुरू ठेवणे आवश्यक आहे. बाजार घसरल्यावर घाबरून एसआयपी बंद करू नये. तसंच, वार्षिक उत्पन्न वाढल्यास एसआयपीची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि योग्य म्युच्युअल फंडाची निवड करावी.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकीत जोखीम असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
