Mutual Fund Investment : गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावाही दिलाय. पण अशातच एका फंडातील गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. येस बँकेच्या एटी-१ बॉन्ड्समधील गुंतवणुकीमुळे निप्पॉन लाइफ इंडिया (Nippon Life India) म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूकदारांचं १८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
मात्र, या व्यवहारातून फंड हाऊसला शुल्कापोटी ८८.६० कोटी रुपये मिळाले आहेत. शेअर बाजाराचं नियमन करणारी संस्था सेबीनं (SEBI) मनीकंट्रोलला ही माहिती दिली. निप्पॉन लाइफ इंडिया म्युच्युअल फंड हा रिलायन्स म्युच्युअल फंड म्हणून ओळखला जातो. एटी-1 बाँड्सबद्दल बोलायचं झालं तर ही एक प्रकारची कर्जाची सुविधा आहे जी बँकांकडून आपला भांडवली आधार वाढविण्यासाठी जारी केली जाते.
सीबीआय चौकशीच्या कक्षेत
राणा कपूर कुटुंबीयांच्या मालकीच्या मॉर्गन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरमध्ये (एनसीडी) ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याप्रकरणी निप्पॉन लाइफ इंडिया म्युच्युअल फंडाची सीबीआय चौकशी सुरू असल्याची बातमी मनीकंट्रोलने डिसेंबर २०२४ मध्ये दिली होती. हे प्रकरण डिसेंबर २०१६ ते मार्च २०२० या कालावधीतील आहे. याच काळात येस बँक आणि रिलायन्स कॅपिटलच्या मालकीच्या कंपन्यांमधील काही व्यवहार सेबीच्या लक्षात आले.
रिलायन्स कॅपिटलची गुंतवणूक
चौकशीच्या आधारे सेबीनं बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये तत्कालीन रिलायन्स म्युच्युअल फंड आणि रिलायन्स कॅपिटलनं येस बँकेनं जारी केलेल्या एटी-१ बॉन्ड्समध्ये २,८५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुंतवणुकीचा काही भाग मॉर्गन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेडनं जारी केलेल्या एनसीडीमध्ये केला होता.
गुंतवणुकीचे कारण
सेबीच्या म्हणण्यानुसार, येस बँकेनं जानेवारी २०१७ मध्ये रिलायन्स होम फायनान्सला ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची सुविधा दिली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये येस बँकेनं रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्सनं जारी केलेल्या एनसीडीमध्ये गुंतवणूक म्हणून २,९०० कोटी रुपयांची आणखी एक कर्ज सुविधा दिली.