hybrid fund : शेअर बाजार हा अनिश्चित पावसासारखा आहे. इथे कधी काय होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत अभ्यासपूर्ण गुंतवणूक फार महत्त्वाची आहे. बाजारातील अनपेक्षित चढ-उतार (Volatility) टाळणे कठीण असले तरी, त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम कमी करणे शक्य आहे. यासाठी हायब्रिड फंड (Hybrid Funds) एक उत्तम पर्याय ठरू शकतात, असे आर्थिक सल्लागार सांगतात.
बाजार अस्थिर असला तरी चिंता नाही!
तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन दशकांत सेन्सेक्स २४ टक्क्यांहून अधिक वेळा वाढला असला तरी, हा प्रवास नेहमीच सोपा नव्हता. जागतिक आर्थिक संकट (२००८), कोविड-१९ चा काळ (२०२०) किंवा अमेरिकेच्या नवीन व्यापार शुल्कांच्या घोषणेनंतर (एप्रिल २०२५) बाजारात १५% पर्यंत मोठी घसरण झाली होती. अशा अचानक येणाऱ्या धक्क्यांमुळे कमी जोखीम घेऊ इच्छिणारे गुंतवणूकदार चिंतेत पडतात. अशावेळी, जोखीम कमी करूनही बाजारात गुंतवणूक करुन चांगली संपत्ती कशी निर्माण करावी, याचे उत्तर हायब्रिड फंड देतात.
हायब्रिड फंड कसे काम करतात?
हायब्रिड फंड म्हणजे एकाचवेळी दोन किंवा अधिक प्रकारच्या मालमत्तांमध्ये (Asset Classes) गुंतवणूक करणारे फंड. यात सहसा शेअर्स, कर्जरोखे (Debt) आणि कधीकधी सोने (Gold) यांसारख्या मालमत्तांचा समावेश असतो. या मालमत्ता एकमेकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. उदा. शेअर बाजार घसरल्यास डेट किंवा सोने वाढू शकते, ज्यामुळे पोर्टफोलिओमधील एकूण अस्थिरता कमी होते.
उदाहरणार्थ: तुम्ही तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी १० वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल आणि तुम्हाला बाजारातील चढ-उतार नको असतील, तर तुम्ही बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडचा (Balanced Advantage Fund) विचार करू शकता. हे फंड बाजाराच्या परिस्थितीनुसार शेअर्स आणि डेटमध्ये गुंतवणूक वाढवतात किंवा कमी करतात, ज्यामुळे जोखीम आणि परतावा यांच्यात उत्तम संतुलन साधले जाते. अधिक वैविध्य हवे असल्यास, तुम्ही मल्टी-ॲसेट अॅलोकेशन फंडमध्ये (Multi-Asset Allocation Fund) गुंतवणूक करू शकता, जो शेअर्स, डेट आणि कमोडिटीजमध्ये (उदा. सोने) गुंतवणूक करतो.
कमी कालावधीसाठीही पर्याय उपलब्ध!
जर तुमची गुंतवणूक फक्त ३ वर्षांपर्यंत असेल, तर तुम्ही इक्विटी सेव्हिंग फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड इक्विटी, आर्बिट्रेज संधी आणि डेटमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे बाजारातील घसरणीची जोखीम कमी होते. जे लोक दरमहा नियमित उत्पन्न मिळवू इच्छितात (उदा. SWP - Systematci Withdrawal Plan द्वारे), त्यांच्यासाठीही हे फंड फायदेशीर ठरतात.
कराचा फायदाही मिळेल!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे हायब्रिड फंड ६५% पेक्षा जास्त इक्विटीमध्ये (शेअर्समध्ये) गुंतवणूक करतात, त्यांना इक्विटी कर आकारणीचा (Equity Taxation) फायदा मिळतो. याचा अर्थ, तुम्हाला एका आर्थिक वर्षात १.२५ लाख रुपयांपेक्षा जास्त झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (Long Term Capital Gains) फक्त १२.५% दराने कर लागतो, जो तुमच्या सामान्य आयकर स्लॅबपेक्षा खूपच कमी असतो.
थोडक्यात, बाजारातील अनिश्चिततेला घाबरून न जाता, योग्य हायब्रिड फंड निवडून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला 'सुरक्षित' ठेवू शकता आणि चांगले परतावे देखील मिळवू शकता!
वाचा - १ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)