Retirement Planning : वाढती महागाई, राहणीमानाचा खर्च आणि भविष्यातील वैद्यकीय गरजा पाहता, निवृत्तीच्या वेळी हाताशी मोठी रक्कम असणे ही आता चैन नसून गरज बनली आहे. केवळ बचत करून चालणार नाही, तर संपत्ती निर्मितीसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक आवश्यक आहे. जर तुमचे वय आज ३५ वर्षे असेल आणि वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्हाला २ कोटी रुपयांचा निधी उभा करायचा असेल, तर म्युच्युअल फंडमधील 'एसआयपी' हा एक सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.
SIP म्हणजे नक्की काय?
'सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' हा गुंतवणुकीचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. यात गुंतवणूकदार दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात. शेअर बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेत दीर्घकाळात मोठी रक्कम उभी करण्यासाठी हे तंत्र डिझाइन केलेले आहे. ज्यांना एकदम मोठी रक्कम गुंतवणे शक्य नाही, अशा नोकरदार वर्गासाठी हा 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे काम करणारा पर्याय आहे.
सरासरी १२ टक्के परतावा
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर बाजाराशी निगडीत असल्याने यात परताव्याची निश्चित हमी नसते. मात्र, ऐतिहासिक आकडेवारीनुसार, दीर्घकालीन गुंतवणुकीवर सरासरी १२ ते १५ टक्के परतावा मिळतो, असे दिसून आले आहे. आपण सुरक्षित बाजू म्हणून १२ टक्के परतावा गृहीत धरून २ कोटींच्या ध्येयाचे गणित मांडूया.
२ कोटींच्या निधीसाठी गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन
जर तुम्ही आज (वयाच्या ३५ व्या वर्षी) सुरुवात केली आणि पुढील २० वर्षे (वयाच्या ५५ पर्यंत) गुंतवणूक सुरू ठेवली, तर चित्र खालीलप्रमाणे असेल.
- मासिक एसआयपी : २०,२००
- गुंतवणुकीचा कालावधी : २० वर्षे
- अपेक्षित परतावा : १२%
- तुमची एकूण गुंतवणूक : ४८,४८,००० रुपये
- मिळालेला एकूण परतावा : १,५३,३४,७८८ रुपये
- २० वर्षांनंतरचा एकूण निधी : २,०१,८२,७८८ रुपये
वाचा - महागाईचा 'तडाखा': बिस्किटे, चिप्स आणि शॅम्पू महागणार! पाकीट तेच, पण वजन घटणार; १ एप्रिलपासून नवे दर
दीर्घकालीन गुंतवणुकीचे 'हे' फायदे लक्षात घ्या
- कंपाउंडिंगची ताकद : तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक कराल, तितका तुमच्या व्याजावर मिळणाऱ्या व्याजाचा वेग वाढतो. वरील उदाहरणात तुमच्या मूळ गुंतवणुकीपेक्षा परताव्याची रक्कम तिप्पट आहे, हेच चक्रवाढ व्याजाचे वैशिष्ट्य आहे.
- रुपी कॉस्ट एव्हरेजिंग : जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तुम्हाला जास्त 'युनिट्स' मिळतात आणि बाजार वाढतो तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू वाढते. यामुळे गुंतवणुकीची सरासरी किंमत संतुलित राहते.
- शिस्त : दरमहा ठराविक रक्कम खात्यातून कापली जात असल्याने बचतीची सवय लागते.
