SIP Investment Plan : स्वत:चे घर, मुलांचे उच्च शिक्षण किंवा निवृत्तीनंतरचे सुरक्षित आयुष्य... या सर्व स्वप्नांसाठी किमान १ कोटी रुपयांचा निधी असणे आजच्या काळात आवश्यक बनले आहे. अनेकांना १ कोटी ही रक्कम खूप मोठी वाटते. परंतु, योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या जोरावर हे लक्ष्य गाठणे अशक्य नाही. म्युच्युअल फंडातील 'एसआयपी' हा त्यासाठीचा सर्वात प्रभावी मार्ग ठरत आहे.
एसआयपी म्हणजे काय?
'सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' म्हणजेच एसआयपी हा गुंतवणुकीचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात. यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो. तुम्ही अगदी ५०० रुपयांपासूनही सुरुवात करू शकता. यामुळे बचतीची सवय लागते आणि दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो.
१० वर्षांत १ कोटी जमा करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
म्युच्युअल फंडात परताव्याची कोणतीही निश्चित मर्यादा नसते, तरीही दीर्घकालीन इक्विटी म्युच्युअल फंडात सरासरी १२% वार्षिक परतावा गृहीत धरला जातो. या आधारे १ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खालील गणित समजून घेऊया.
| घटक | तपशील |
| लक्ष्य | १ कोटी |
| कालावधी | १० वर्षे |
| अपेक्षित परतावा | १२% वार्षिक |
| मासिक एसआयपी | ४३,०५० रुपये |
| १० वर्षांनंतर मिळणारा एकूण निधी | १,००,०२,१९७ रुपये |
(टीप: जर परतावा १२% पेक्षा जास्त मिळाला, तर तुमची मासिक हप्त्याची रक्कम कमी होऊ शकते. याउलट बाजार खाली असल्यास हप्ता वाढवावा लागू शकतो.)
हा मार्ग का निवडावा?
- एकरकमी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दरमहा थोडी-थोडी रक्कम गुंतवणे सोपे जाते.
- मुदत ठेवी किंवा साध्या बचतीच्या तुलनेत एसआयपी महागाईवर मात करणारा परतावा देण्यास सक्षम आहे.
- तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल, तेवढा जास्त नफा तुम्हाला व्याजावर मिळणाऱ्या व्याजामुळे मिळेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
