Lowest Return Mutual Fund : गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातगुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुंतवणूकदार चांगल्या परताव्याच्या आशेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मात्र, म्युच्युअल फंडातील परतावा हा थेट शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो. त्यामुळे यात पैसे कमावण्याची जशी शक्यता असते, तशीच पैसे बुडण्याचीही शक्यता असते. आम्ही आज तुम्हाला अशाच काही फंड्सबद्दल माहिती देत आहोत, ज्यांनी चालू वर्षात नकारात्मक परतावा दिला आहे.
या फंड्सनी बुडवले गुंतवणूकदारांचे पैसे
म्युच्युअल फंडात किमान १२ ते १४ टक्के परतावा मिळेल असे मानले जाते, पण बाजारातील स्थितीनुसार तो कमी किंवा जास्त होऊ शकतो. खालील फंड्सनी तर परतावा देणे सोडाच, उलट गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आहेत.
| फंडचे नाव | चालू वर्षातील परतावा (रिटर्न) |
| सॅमको ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड | -१६.४०% |
| बंधन निफ्टी आयटी इंडेक्स फंड | -१४.२०% |
| ॲक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड | -१४.२०% |
| निप्पॉन इंडिया निफ्टी आयटी इंडेक्स फंड | -१४.००% |
| नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंड | -१४.००% |
| मिराए ॲसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० मोमेंटम क्वालिटी १०० ईटीएफ एफओएफ | -१३.००% |
| डीएसपी निफ्टी स्मॉलकॅप २५० क्वालिटी ५० इंडेक्स फंड | -१२.२०% |
| क्वांट टेक फंड | -१२.२०% |
यामध्ये बहुतेक आयटी आणि स्मॉलकॅप इंडेक्स फंड्सचा समावेश आहे.
गुंतवणुकीतील जोखीम कशी ओळखायची?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना केवळ परतावा न पाहता, त्यातील जोखीम ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी खालील तीन महत्त्वाचे घटक तपासा.
१. बीटा
बीटा हे दर्शवते की तुमचा फंड बाजारातील चढ-उतारांवर किती संवेदनशील आहे.
जर बीटा १ पेक्षा कमी असेल, तर तुमच्या फंडातील जोखीम कमी आहे. म्हणजे, बाजारात मोठी घसरण झाली तरी तुमच्या फंडावर कमी परिणाम होईल.
जर बीटा १ पेक्षा जास्त असेल, तर तुमचा फंड जोखमीचा मानला जातो.
२. स्टँडर्ड डेव्हिएशन
स्टँडर्ड डेव्हिएशन हे फंडाच्या परताव्यामध्ये किती चढ-उतार आहेत, हे दर्शवते.
जेव्हा तुम्ही दोन फंड्सची तुलना करता, तेव्हा ज्या फंडाचे स्टँडर्ड डेव्हिएशन टक्केवारीमध्ये कमी असेल, तो फंड कमी जोखीम असलेला मानला जातो.
उदाहरणार्थ: एका फंडाचे स्टँडर्ड डेव्हिएशन ५% आहे आणि दुसऱ्याचे १०% आहे, तर ५% असलेला फंड कमी जोखीम असलेला आहे.
३. शार्प रेश्यो
शार्प रेश्योच्या मदतीने तुम्ही म्युच्युअल फंडातील जोखीम समायोजित परतावा सहजपणे तपासू शकता. हा रेश्यो जितका जास्त असेल, तितका फंड चांगला.
शार्प रेश्यो < १.००: फंडात जोखीम कमी आहे.
शार्प रेश्यो १.०० ते १.९९: फंडात सामान्य जोखीम आहे.
शार्प रेश्यो २.०० ते २.९९: फंडात उच्च जोखीम आहे.
शार्प रेश्यो > ३.००: फंडात अतिउच्च जोखीम आहे.
गुंतवणूक करताना या तिन्ही घटकांचा अभ्यास करणे आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारे फंड निवडणे आवश्यक आहे.
वाचा - आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
