SIP Calculator : नोकरीला लागल्यानंतर किंवा कमाई सुरू केल्यानंतर बहुतेक तरुण त्यांची स्वप्न आणि छंद पूर्ण करण्याच्या मागे लागतात. मात्र, यासोबत गुंतवणूक सुरू करणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असते. आजच्या काळात आर्थिक स्वातंत्र्य असणे फार आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. आजच्या काळात, नोकरी सुरू केलेल्या अनेक तरुणांनी त्यांच्या पगाराचा काही भाग गुंतवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीही तरुण असाल आणि तुमच्या भविष्यातील गरजांसाठी एक मोठा निधी तयार करण्याचे उद्दीष्ट असेल, तर आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत. हा फॉर्म्युला म्युच्युअल फंड एसआयपीसाठी आहे.
एसआयपीचा १२-१२-२५ फॉर्म्युला काय आहे?
भारत पाकिस्तान संघर्ष सुरू असताना गेल्या १ महिन्यात म्युच्युअल फंडात तब्बस २६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यावरुन याची लोकप्रियता समजू शकते. म्युच्युअल फंड एसआयपी हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट आणि प्रभावी गुंतवणूक साधन मानले जाते. ही योजना बाजाराशी निगडीत असल्याने इथे जोखीम नक्कीच आहे. पण, दीर्घकालीन गुंतवणुकीत ती खूप कमी होते. तुम्ही जितक्या लवकर एसआयपी सुरू कराल आणि जितका जास्त काळ तो सुरू ठेवाल तितके जास्त फायदे मिळतील. एसआयपीचा १२-१२-२५ चे सूत्रातील पहिले १२ म्हणजे दरमहा १२,००० रुपयांचे एसआयपी, दुसरे १२ म्हणजे दरवर्षी सरासरी १२ टक्के अपेक्षित परतावा आणि २५ म्हणजे तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करावी लागेल.
२५ वर्षांत २ कोटी रुपयांचा निधी
जर तुम्ही एसआयपीच्या १२-१२-२५ फॉर्म्युला वापरून गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही २५ वर्षांच्या कालावधीत २.०४ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. यामध्ये २५ वर्षात मिळणारा परतावा सरासरी १२ टक्के इतका गृहित धरला आहे. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा तुम्ही ५० वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्याकडे २ कोटी रुपयांचा निधी असेल. दरम्यान, म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. ही शेअर बाजाराशी निगडीत असल्याने इथे जोखीम आहे. दुसरं म्हणजे तुमचा फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही शुल्क आकारले जाते. शेवटचं आणि महत्त्वाचे म्हणजे एसआयपी मधून मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला भांडवली नफा कर देखील भरावा लागतो.
वाचा - SIP ने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, एका महिन्यात 26 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)