Laptop sold for Rs 190, but not delivered; Now the consumer court has hit Amazon hard | १९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका

१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका

नवी दिल्ली - गेल्या काही काळात ई-कॉमर्स आणि ऑनलाइन शॉपिंग चांगलेच वाढले आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या फेस्टिव्हल सिझनमध्ये ग्राहकांसाठी विशेष सवलती जाहीर करत असतात. मात्र, अशा सवलती, सूट आणि ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याच्या घाईगडबडीत अ‍ॅमेझॉनला मोठा फटका बसला आहे. आपल्या साइटवरून १९० रुपयांना लॅपटॉप विक्री केल्यानंतर तो डिलिव्हर न केल्याने ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दणका दिला आहे.

हे प्रकरण २०१४ मधील आहे. डिसेंबर २०१४ मध्ये अ‍ॅमेझॉनने आपल्या साइटवर एक लॅपटॉप केवळ १९० रुपयांना विक्रीसाठी ठेवला होता. हा लॅपटॉप ओदिशामधील एका लॉ कॉलेजमधील विद्यार्थी सुप्रियो रंजन याने खरेदी केला. मात्र अ‍ॅमेझॉनने हा लॅपटॉप सदर विद्यार्थ्याला डिलिव्हर केला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि अ‍ॅमेझॉनविरोधात तक्रार दिली.

दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत ओदिशाच्या ग्राहक मंचाने मानसिक त्रास आणि शोषणाची नुकसान भरपाई म्हणून ४० हजार रुपये सबंधित विद्यार्थ्याला देण्याचे आदेश अ‍ॅमेझॉनला दिले. तसेच खरेदीदाराचे नुकसान आणि खटला दाखल करण्याची रक्कम म्हणून पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची सूचनाही अ‍ॅमेझॉनला दिली आहे.

हा निर्णय देताना ग्राहक आयोगाने सांगितले की, कंपनीच्या बेफिकीरीमुळे या विद्यार्थ्याला २२ हजार ८९९ रुपयांचा अजून एक लॅपटॉप खरेदी करावा लागला. त्यामुळे त्याचे शैक्षणिक प्रोजेक्ट पूर्ण होण्यास उशीर झाला. अ‍ॅमेझॉनने २३ हजार ४९९ रुपये मूळ किंमत असलेला एक लॅपटॉप वेबसाइटवर १९० रुपयांना विक्रीसाठी ठेवला होता. याचा अर्थ या लॅपटॉपवर २३ हजार ३०९ रुपयांची सवलत दिली होती. आयोगाने याबाबत सांगितले की, अ‍ॅमेझॉनने केवळ तक्रारकर्त्याला योग्य सेवा देण्याबाबत बेफिकीर दाखवली नाही तर अयोग्य व्यवहारदेखील केला. त्यामुळे कंपनीला दंड ठोठावण्यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Laptop sold for Rs 190, but not delivered; Now the consumer court has hit Amazon hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.