IT Couple Farming : बहुतेक लोक सुरक्षित नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहतात आणि तेच आपलं यश मानतात. पण काही लोक असे असतात, जे नोकरीची सुरक्षितता सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस दाखवतात. आज आपण आंध्र प्रदेशातील अशाच एका जोडप्याची कहाणी पाहणार आहोत, ज्यांनी आयटी क्षेत्रातील लाखोंची नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात प्रचंड यश मिळवलं. हे जोडपे आहे के. मणिकांत आणि त्यांच्या पत्नी नागा वेंकट दुर्गा पवनी.
Infosys, Accenture सोडून शेतीकडे वळले!
मणिकांत इन्फोसिसमध्ये, तर त्यांची पत्नी पवनी ॲक्सेंचरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होत्या. पण त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. मणिकांत यांना वाटायचं की आयटी क्षेत्रात चांगला पगार मिळत असला तरी लोकांचं आरोग्य बिघडतंय आणि जीवनशैली खूप वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना निरोगी बनवण्याचा विचार केला. या जोडप्याला हे लक्षात आलं की, लोकांचं आरोग्य सुधारण्याची गरज आहे आणि त्याच वेळी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे पीक विकताना अनेक अडचणी येतात. या दोन समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी सेंद्रिय शेती करायचं ठरवलं.
प्रशिक्षण घेऊन बनले शेतकरी
मणिकांत आणि पवनी यांना शेतीबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणून त्यांनी सुभाष पालेकर नैसर्गिक शेती पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं आणि रसायनांशिवाय सेंद्रिय शेती कशी करायची हे शिकून घेतलं. सुरुवातीला मणिकांत नोकरी करतच प्रशिक्षण घेत होते, पण नंतर त्यांनी शेतीसाठी नोकरी सोडली.
१७ लाखांची गुंतवणूक, आज ९० लाखांची उलाढाल!
२०१७ मध्ये, मणिकांत आणि त्यांच्या पत्नीने १७ लाख रुपयांची गुंतवणूक करून 'श्रेष्ठा' नावाचं एक सेंद्रिय दुकान सुरू केलं. त्यांनी आंबा, बाजरीचं पीठ, तूर डाळ आणि हेल्थ मिक्स पावडर यांसारखी अनेक सेंद्रिय आणि आरोग्यदायी उत्पादनं बनवली. ही उत्पादनं लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली.
या जोडप्याने सेंद्रिय शेतकऱ्यांसोबत काम केलं आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली किंमत दिली, ज्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा झाला. आज 'श्रेष्ठा'ची उत्पादनं खूप प्रसिद्ध आहेत. हे जोडपे या व्यवसायातून दरमहा ७.५ लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत आणि 'श्रेष्ठा'ची एकूण उलाढाल आता ९० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
वाचा - बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
आयटी नोकरी सोडून शेतीत क्रांती घडवणाऱ्या या जोडप्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देत आहे.