आरोग्य विमा घेताना धूम्रपान व मद्यपानाच्या सवयी जाहीर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. या सवयी लपवल्यास आरोग्य विम्याचा दावा उशिरा मिळू शकतो, कमी रक्कम मिळू शकते किंवा दावा पूर्णपणे नाकारलाही जाऊ शकतो.
जाणकारांनी सांगितले की, विमा कंपन्यांच्या मते, धूम्रपान आणि मद्यपानामुळे कर्करोग, हृदयविकार, फुप्फुसाचे आजार, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या कारणांवर आधारित दावे ते नीट तपासून घेत असतात. त्यामुळे या सवयी लपवणे विमाधारकाच्या हिताचे नाही.
...तर कंपनी तुमचा दावा नाकारू शकत नाही
केअर हेल्थ इन्शुरन्सचे सीओओ मनीष दोडेजा यांनी सांगितले की, धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या व्यसनांची माहिती न दिल्यास त्यांच्या प्रीमियम दरावर व कव्हरवर परिणाम होतो. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सवयी विमा घेतानाच जाहीर केल्या, तर कंपनी दावा थेट नाकारू शकत नाही. सवयी लपवल्या असल्यास मात्र या कारणावरून दावा नाकारला जाऊ शकतो.
आरोग्य विम्याचे प्रीमियम दर हे जोखमीवर ठरतात. सामान्य प्रमाणात धूम्रपान वा मद्यपान करणाऱ्यांसाठी दरात फरक नसतो, पूर्वीचे आजार असल्यास १० ते २० टक्के जास्तीचा प्रीमियम लागू शकतो.
दावा नाकारला गेल्यास काय करावे?
सूत्रांनी सांगितले की, आरोग्य विम्याचा दावा नाकारला गेला, तर विमाधारक कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे किंवा नंतर विमा लोकपालाकडे अर्ज करू शकतो. गरज भासल्यास ग्राहक आयोगातही तक्रार दाखल करून आपली व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचून न्याय मागता येतो, असे जाणकारांनी सांगितले.
