ayushman bharat yojana : महागाईच्या काळात प्रत्येकाजवळ आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. मात्र, अजूनही आरोग्य विम्याची किंमत देशातील बहुसंख्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी २०१८ मध्ये मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली. याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असेही म्हणतात. ही जगातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी एक आहे. आयुष्मान योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांना आयुष्मान कार्ड मिळते. मात्र, याचा लाभ कोण घेऊ शकतो हे माहिती आहे का?
५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण
या योजनेत ५,००,००० रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतात. सप्टेंबर २०२४ मध्ये, आयुष्मान योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. सरकारने ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, त्यांचे उत्पन्न काहीही असो, या योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या नागरिकांना आयुष्मान वय वंदन कार्ड देण्यात आले आहे.
आयुष्मान भारत योजनेत कोण लाभार्थी आहेत?
विशेषतः गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान कार्ड सुरू करण्यात आले आहे. संघटित क्षेत्रात काम करणारे, आयकर भरणारे, ESIC लाभ घेणारे किंवा ज्यांचे वेतन PF साठी कापले जाते त्यांना आयुष्मान कार्डचा लाभ मिळत नाही. सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना (SECC-2011) मध्ये लाभार्थी असलेली कुटुंबे प्रामुख्याने आयुष्मान कार्डसाठी पात्र आहेत.
ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणारे कुटुंब, ज्या कुटुंबात १६-५९ वयोगटातील कोणीही प्रौढ पुरुष नाही, अनुसूचित जाती/जमाती कुटुंबे आणि भूमिहीन कामगार आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतात. शहरी भागात राहणारे कचरा वेचणारे, घरकाम करणारे, बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते यासारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेली कुटुंबे देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? सरकार आणखी एक नवीन योजना आणणार? असा मिळेल फायदा
आपलं नाव यादीत कसं तपासायचं?
जर तुम्हालाही आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही तुमची पात्रता ऑनलाइन तपासू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला काही आवश्यक माहिती विचारली जाईल. ती भरल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही? हे समोर येईल.