Health Insurance Premium : दरवर्षीच्या हेल्थ इन्शुरन्सच्या वाढत्या प्रीमियममुळे तुम्ही त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी बचतीची एक उत्तम कल्पना सांगत आहोत. या कल्पनेचा अवलंब करून तुम्ही आरोग्य विम्याच्या हप्त्यात २०% ते २५% सहज बचत करू शकता. ही कल्पना काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तो 'को-पे'चा पर्याय आहे. हा पर्याय निवडून तुम्ही सहज चांगल्या रकमेची बचत करू शकता.
विमा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे प्रत्येकासाठी फायदेशीर असले तरी आरोग्याच्या जोखमीमुळे त्यांचे प्रीमियम खूप जास्त असल्यानं ज्येष्ठ नागरिकांसाठी ते अधिक फायदेशीर आहे. याशिवाय पॉलिसीचा प्रीमियम कमी करण्याचा आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे डिडक्टबल. याचा वापर करून तुम्ही प्रीमियमही कमी करू शकता.
उदाहरणाद्वारे जाणून घेऊ
समजा आपण विमा कंपनीकडून स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर हेल्थ प्लॅन घेतला आहे. याचा वार्षिक प्रीमियम २० हजार रुपये आहे. आता जर तुम्ही २०% को-पे ची निवड केली तर तुम्हाला ५ हजार रुपयांची सहज बचत करता येईल. याशिवाय अनेक आरोग्य विमा कंपन्या डिडक्टबलचा पर्याय देतात. यात तुम्ही ठराविक रक्कम आगाऊ भरता. यानंतर विमा कंपनी क्लेमची रक्कम भरते. डिडक्टबलचा पर्याय निवडल्यास प्रीमियमची रक्कम कमी होते.
डिडक्टबल आणि को-पेमधील फरक
क्लेमपूर्वी तुमची आरोग्य विमा कंपनी जी रक्कम भरते त्याला डिडक्टबल म्हणतात. त्याचबरोबर को-पेमध्ये तुम्ही क्लेमच्या रकमेचा ठराविक भाग भरता. ती १०% ते २०% असू शकते.
डिडक्टबल कसं काम करतं?
समजा तुमच्याकडे १० लाख रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी आहे, ज्यात ५०,००० रुपयांची डिडक्टबल रक्कम आहे. जर तुम्ही कधीही ४ लाख रुपयांचा क्लेम दाखल केला तर तुमची आरोग्य विमा कंपनी फक्त ३.५ लाख रुपये देईल. त्यासाठी आधी ५० हजार रुपये मोजावे लागतील. दुसऱ्या शब्दांत, आपली आरोग्य विमा कंपनी केवळ डिडक्टबल रकमेपेक्षा जास्त वैद्यकीय खर्च देण्यास जबाबदार आहे.