Indian Stock Market : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी उलथापालथ झाली. प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी, काही विशिष्ट क्षेत्रातील शेअर्स मात्र तेजीत राहिले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.
सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५११ अंकांनी घसरून ८१,८९७ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४१ अंकांनी घसरून २४,९७२ अंकांवर स्थिरावला. महत्त्वाचे म्हणजे, निफ्टी २५,००० च्या खाली बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकही १९४ अंकांच्या घसरणीसह ५६,०५९ वर बंद झाला. मात्र, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खालच्या पातळीवरून काही प्रमाणात सुधारणा दिसून आली, निफ्टी मिडकॅप निर्देशांक २११ अंकांच्या वाढीसह ५८,२०७ वर बंद झाला.
कोणत्या क्षेत्राला फटका, कोण ठरले मजबूत?
घसरण : अमेरिकन कंपनी अॅक्सेंचरच्या तिमाही निकालानंतर आयटी (IT) शेअर्सवर मोठा दबाव राहिला. यात इन्फोसिस २% नी घसरून बंद झाला. याशिवाय, ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांकही घसरले. सरकारने दुचाकी वाहनांसाठी ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडल्याने बजाज ऑटो १% नी घसरला. बँकिंग आणि फार्मा समभागांमध्येही आज दबाव दिसून आला. डॉ. लाल पथ लॅब्सचा शेअर ४% नी घसरला, कारण अॅमेझॉनने डायग्नोस्टिक क्षेत्रात प्रवेश केला आहे.
तेजी : युद्धजन्य परिस्थितीतही संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी सुरूच राहिली. नवीन ऑर्डर मिळाल्याने आणि इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर गार्डन रीच शिपबिल्डर्सचा शेअर ६% वाढीसह बंद झाला. आयडियाफोर्जला संरक्षण मंत्रालयाकडून १४७ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने तो १०% नी वधारला. क्षेत्रीय आघाडीवर, पीएसई (सार्वजनिक उपक्रम) आणि धातू निर्देशांक वाढीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ७७ डॉलर्सपेक्षा कमी झाल्यानंतर तेल विपणन कंपन्या आणि पेंट स्टॉकमध्ये सुधारणा दिसून आली.
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
झी एंटरप्रायझेसचा शेअर ११% वाढीसह बंद झाला, कारण कंपनीने २०२६ च्या आर्थिक वर्षापर्यंत त्यांचा 'झेड५' (Z5) प्लॅटफॉर्म ब्रेकइव्हन गाठेल असे म्हटले आहे.
एनबीसीसी (NBCC) ला २९७ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांचा शेअर २% वाढीसह बंद झाला.
बीएसई (BSE) ३% आणि इंडिगो (Indigo) १% वाढीसह बंद झाले, कारण त्यांच्या निफ्टीमध्ये समावेश होण्याची शक्यता असल्याची बातमी होती.
वाचा - निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
एकंदरीत, जागतिक तणाव आणि काही क्षेत्रांतील नकारात्मक बातम्यांमुळे बाजारात घसरण झाली असली तरी, काही विशिष्ट क्षेत्रांनी बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला.