दुबईतील आलिशान जीवनशैली आणि दुर्मिळ नंबर प्लेटची आवड असलेला भारतीय उद्योगपती बलविंदर सिंग साहनी याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, न्यायालयानं त्याच्याकडून १५० मिलियन दिरहम (सुमारे ३४४ कोटी रुपये) जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्याला पाच लाख दिरहम (सुमारे एक कोटी १४ लाख रुपये) दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला देशाबाहेर काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
कोण आहे बलविंदर सिंग साहनी?
बलविंदर सिंग साहनी उर्फ 'अबू सबाह' दुबईतील एका प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. युएई, अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला आहे. खलीज टाईम्सच्या म्हणण्यानुसार, तो आरएसजी ग्रुपचा चेअरमन होता आणि अनेकदा पारंपारिक अमिराती पोशाख परिधान करतानाही दिसायचा.
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
वाहनांपेक्षा नंबर प्लेट अधिक मौल्यवान
साहनी याचं आलिशान आयुष्य चर्चेत होतं. २०१६ मध्ये दुबईची 'डी ५' नंबर प्लेट ३३ मिलियन दिरहम (सुमारे ७५ कोटी रुपये) मध्ये विकत घेऊन तो चर्चेत आला होता. माझ्याकडे दुबई आणि अबू धाबी या दोन्ही ठिकाणच्या '५' नंबर प्लेट आहेत. माझ्या वाहनांच्या नंबर प्लेटपेक्षा माझ्या वाहनांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत," असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं.
त्यांच्यावर वाईट नजर पडू नये म्हणून काळ्या रंगाची बुगाटी गाडी घरात ठेवण्याचीही चर्चा होती. एका मुलाखतीत तो "मला काळा रंग आवडत नाही, पण लोकांनी सल्ला दिला की यामुळे वाईट नजरेपासून माझं रक्षण होईल," असं तो म्हणाला होता.
काय आहे आरोप?
साहनी यांच्यावर खोट्या कंपन्या आणि संशयास्पद व्यवहारांद्वारे १५० मिलियन दिरहमचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. दुबई कोर्टानं त्याला ५ वर्षांचा तुरुंगवास, दंड आणि हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा मुलगा आणि इतर ३२ जणांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. यातील काही आरोपी फरार आहेत, तर काहींना एक वर्षाचा तुरुंगवास आणि दोन लाख दिरहम दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.