Pakistan Stock Exchnage: एकीकडे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली तर दुसरीकडे पाकिस्तानच्याशेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. पाकिस्तानच्या शेअर बाजारानं नवा उच्चांक गाठला. पाकिस्तान शेअर बाजारानं (PSX) सोमवारी इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान १,३५,००० चा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा उच्चांक गाठला. केएसई १०० निर्देशांक १,४२३.७७ अंकांनी वधारून १,३५,७२३.५३ अंकांवर बंद झाला. कराची स्थित ब्रोकरेज फर्म टॉपलाइन सिक्युरिटीजने गेल्या आठवड्यात या वाढीला म्युच्युअल फंडांकडून सातत्यानं होणारी गुंतवणूक कारणीभूत असल्याचं सांगत गुंतवणूकदार फिक्स्ड इन्कम अॅसेटऐवजी इक्विटी फंडांकडे वळत असल्याचं म्हटलं होतं.
तेजीचे कारण काय?
"गुंतवणूकदार फिक्स्ड इन्कम असेट क्लासमधून इक्विटीकडे वळत असल्यानं शेअर बाजार नवीन उच्चांक गाठत आहेत," असं आरिफ हबीब लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद अली हबीब यांनी अरब न्यूजला सांगितलं. स्थिर उत्पन्नावरील परतावा कमी असल्यानं गुंतवणूकदार इक्विटीकडे वळत आहेत. गुंतवणूकदारांना पुढील वर्षीही ते कमी राहतील असं वाटत आहे," असंही ते म्हणाले.
काय म्हणाले एक्सपर्ट?
"अधिक लिक्विडिटी येत आहे आणि गुंतवणूकदार नवीन अल्फा स्टॉक ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत," असं तज्ज्ञांनी म्हटलं. सरकारी प्रसारक रेडिओ पाकिस्ताननं शेअर बाजारातील वाढीचं कारण सरकारच्या आर्थिक धोरणांना दिलं. "शेअर बाजारातील सतत वाढणारा कल सरकारनं सुरू केलेल्या आर्थिक धोरणांवर व्यापारी आणि व्यावसायिक समुदायाचा वाढता विश्वास दर्शवतो," असं रेडिओ पाकिस्ताननं म्हटलंय.