India leads in mobile payments, third in the world | मोबाइल पेमेंटच्या वापरात भारताने घेतली आघाडी, जगात पटकावले तिसरे स्थान

मोबाइल पेमेंटच्या वापरात भारताने घेतली आघाडी, जगात पटकावले तिसरे स्थान

अविनाश कोळी -

सांगली
: ई-कॉमर्समधील विविध प्रकारांमध्ये भारतीयांकडून सर्वाधिक पसंती मोबाइल पेमेंटला मिळाली आहे. विविध खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाइल पेमेंटमध्ये भारत सध्या जगात तिसऱ्या स्थानी असून, मोबाइलच्या माध्यमातून होणारे व्यवहार यापुढे गतीने वाढण्याची चिन्हे आहेत. 

‘ई-कॉमर्स गाईड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगभर गतीने मोबाइल पेमेंट व त्याद्वारे व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. चीन सध्या आघाडीवर असून, त्या ठिकाणचे ८१ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते मोबाइलद्वारे पेमेंट करीत आहेत. त्याखालोखाल डेन्मार्कमध्ये ४०.९ टक्के लोक, तर भारतातील ३७.६ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते मोबाइलद्वारे व्यवहार करीत आहेत. ‘स्टॅटिस्टा’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारतात २०१५ मध्ये मोबाइलद्वारे रिटेल ई-व्यापार ६ बिलियन डॉलरचा होता, तो २०१९ मध्ये ३० बिलियनचा, तर २०२० मध्ये अंदाजे ३८ बिलियन डॉलरचा आहे.

जगभरातील एकूण ई-व्यापारात मोबाइल व्यवहार पहिल्या स्थानी, दुसऱ्या स्थानी क्रेडिट कार्ड, तर तिसऱ्या स्थानी डेबिट कार्डचे व्यवहार आहेत. त्यानंतर बँक टू बँक ट्रान्सफर, कॅश ऑन डिलिव्हरी व अन्य पर्यायांचा वापर केला जात आहे. वर्ल्डलाईन या संस्थेच्या अहवालानुसार भारतात सप्टेेंबर २०२० मध्ये १८० कोटी ऑनलाइन व्यवहार नोंदले गेले. ३ लाख कोटींची ही उलाढाल होती. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीची मागील वर्षातील त्याच तिमाहीशी तुलना केल्यास ८२ टक्के व्यवहारात, तर ९१ टक्के उलाढालीत वाढ नोंदली गेली. यात मोबाइलद्वारे  झालेल्या व्यवहारांचा वाटा सर्वाधिक आहे.

भारतात मोबाइल फोनचे वापरकर्ते वाढले
भारतात कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’, ‘ऑनलाइन शिक्षण’ याप्रमाणेच विविध क्षेत्रातील ऑनलाइन कामकाज वाढले. त्यामुळे भारतातील स्मार्टफोनची खरेदी या काळात वाढली. २०२०-२१ मधील दुसऱ्या तिमाहीत भारतातील स्मार्टफोन विक्रीतील वाढ ३० ते ४० टक्के इतकी होती. वापरकर्ते वाढल्याने मोबाइलद्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारातही वाढ झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India leads in mobile payments, third in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.