New Income Tax Law: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देण्यात आला. तर दुसरीकडे नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर केलं जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं. या आठवड्यात अर्थमंत्री त्याबद्दलची माहिती देऊ शकतात. परंतु आयकर विधेयक कसं असेल, याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
पारदर्शक आणि सोपं
सरकार नवा आयकर कायदा अधिक सोपा आणि पारदर्शक करणार असल्याचं मानलं जात आहे. जे आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असू शकते. सरकार गुरुवारी संसदेत नव्या आयकर कायद्याचं विधेयक मांडण्याची शक्यता आहे.
अनावश्यक तरतुदी रद्द केल्या जातील
जुन्या आयकर कायद्यातील सर्व अनावश्यक तरतुदी काढून करदात्यांच्या सोयीसाठी नव्या तरतुदी जोडल्या जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून करदात्यांना आयकर कायद्यातील अटी समजून घेण्यात अडचण येणार नाही. तसंच नियमांबाबत कोणत्याही प्रकारची शंका बाळगवी लागणार नाही.
सोपी भाषा
नवा आयकर कायदा सोप्या भाषेत असेल, जो सहज समजेल, असंही मानलं जात आहे. जेणेकरून करदाते आणि अधिकाऱ्यांना करविषयक माहितीची समस्या निर्माण होणार नाही.
इन्कम टॅक्सशी संबंधित प्रक्रिया बदलणार आहे
नवं आयकर विधेयक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असेल, असे संकेत अर्थ मंत्रालयाकडून मिळत आहेत. त्यानंतर सामान्य करदात्यांपासून कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत आयकराचे नियमही बदलण्यात येणार आहेत.
करदात्यांना सोपं जावे यासाठी अशा अनेक तरतुदीही काढून टाकण्यात येणार आहेत, ज्यामध्ये करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अनेक कागदपत्रं सादर करावी लागतात. याशिवाय छोट्या-छोट्या चुकांमुळे नोटिसा बजावल्या जात असल्याची प्रकरणंही कमी करण्याची तरतूद केली जात आहे.
सर्वसामान्य लोकही सूचना देऊ शकतात
नवीन आयकर कायदा तयार करण्यासाठी अर्थ मंत्रालय बऱ्याच काळापासून काम करत आहे. त्यासाठी २२ विशेष उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. करदाते आणि सर्वसामान्यांना आपल्या सूचना देता याव्यात यासाठी ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आलंय. अर्थ मंत्रालयाने करदाते, सर्वसामान्य जनता आणि उद्योगांकडून सूचना मागवल्या आहेत.