भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मूडीज रेटिंग्सनं (Moody’s Ratings) मोठा अलर्ट जारी केला आहे. हा तणाव दीर्घकाळ कायम राहिल्यास त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसेल, असं या अहवालात म्हटलंय. याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो, ज्यामुळे सरकारची वित्तीय सुधारणा प्रक्रियाही (Fiscal Consolidation) विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थैर्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं मूडीजनं म्हटलंय.
परकीय कर्ज, परकीय चलन साठ्यावर संकट
सध्याच्या तणावामुळे पाकिस्तानच्या बाह्य निधी मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा मूडीजनं दिला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे असलेला परकीय चलनाचा साठा (Forex Reserves) आगामी काळात परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी अपुरा पडू शकतो. अशा परिस्थितीत आयएमएफसारख्या संस्थांकडून मदत मिळणं पाकिस्तानला अवघड होऊ शकतं, असा इशाराही मूडीजनं दिलाय.
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
... तरी धोका अद्याप टळलेला नाही
मात्र, अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये काही सुधारणा झाल्याचंही मूडीजचं म्हणणं आहे. महागाईत झालेली घसरण, जीडीपीमध्ये हळूहळू होणारी वाढ आणि आयएमएफच्या अटींचं पालन यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु प्रादेशिक शांतता राखल्याशिवाय आणि तणाव कमी होत नाही तोपर्यंत या सुधारणा शाश्वत नाहीत, असंही त्यांचं म्हणणं आहे.
भारताची आर्थिक स्थिती भक्कम आणि स्थिर
भारताविषयी बोलताना मूडीजच्या अहवालात म्हटलंय की, भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. भारताचा जीडीपी विकास स्थिर आहे, सरकारी गुंतवणूक वाढत आहे आणि देशांतर्गत बाजारपेठेत ग्राहकांचा खर्च मजबूत दिसत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताचा पाकिस्तानबरोबरचा व्यापार नगण्य (०.५ टक्क्यांपेक्षा कमी) आहे, त्यामुळे आर्थिक परिणाम मर्यादित राहतील.
भारतावर होणारा परिणाम मर्यादित
सीमेवरील तणाव वाढल्यास भारताला लष्करी खर्च वाढवावा लागू शकतो, असा इशारा मूडीजने दिला आहे. याचा भारताच्या वित्तीय स्थैर्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, पण एकूणच भारताची आर्थिक स्थिती भक्कम राहील, असंही त्यांनी नमूद केलंय.
भारताचं जोरदार प्रत्युत्तर
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानातून होणारी सर्व आयात तिसऱ्या देशातून होत असली तरी त्यावर बंदी घालण्यात आली आहे. टपाल सेवा आणि पार्सल सेवा बंद करण्यात आली असून पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय जहाजांनाही पाकिस्तानी बंदरात जाऊ दिलं जात नाहीये.
सिंधू जल करार स्थगित
भारतानं १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या पाणी हक्कांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं १९७२ चा सिमला करारही स्थगित केला आणि भारताबरोबरचा द्विपक्षीय व्यापारही बंद केला. याशिवाय भारतीय विमान कंपन्यांनाही त्यांच्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.