भारतातील दोन मोठ्या वित्तीय संस्था HDFC आणि ICICI बद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. HDFC चे माजी अध्यक्ष दीपक पारेख यांनी ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या YouTube चॅनलवरील संभाषणादरम्यान अनेक प्रकरणांवर भाष्य केलं. ICICI एकेकाळी HDFC विकत घेऊ इच्छित होतं, असं त्यांनी यावेळी सांगितलं. पाहूया काय आहे याची इन्साईड स्टोरी.
जेव्हा एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं विलीनीकरण झालं तेव्हा आरबीआयनं या ऐतिहासिक विलीनीकरणाला खूप पाठिंबा दिला, असं दीपक पारेख यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. परंतु याच्या खूप पूर्वी एक असाही काळ होता जेव्हा आयसीआयसीआय बँकेनं एचडीएफसी बँक खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं ते म्हणाले. आयसीआयसीआय बँकेनं आम्हाला संपर्क केला होता आणि एचडीएफसी बँक आम्हाला विकायची आहे का अशी विचारणा केली होती. परंतु आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला, असं पारेख म्हणाले.
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
या चर्चेदरम्यान, त्यांनी असंही सांगितले की एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण ही एक नैसर्गिक प्रगती होती जी कालांतराने होणारच होती असं आपलं नेहमीच मत होतं. परंतु जेव्हा आयसीआयसीआयनं अधिग्रहणाचा प्रस्ताव मांडला तेव्हा आपल्याला असं वाटलं की एचडीएफसीची स्वतंत्र ओळख राखणे अधिक महत्त्वाचे आहे, असं पारेख म्हणाले.
आरबीआयची भूमिका महत्त्वाची
पारेख म्हणाले की, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं विलीनीकरण जलदगतीने मंजूर करण्यात आरबीआयनं मोठी भूमिका बजावली. या विलीनीकरणामागील प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती, परंतु रिझर्व्ह बँकेनं उत्तमरित्या आणि पाठिंब्यानं या विलीनीकरणाला मान्यता दिली, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी विलीनीकरणाचा दिवस आठवत हा दिवस आनंदाचा आणि दु:खाचाही होता असं म्हटलं.
देशासाठी उत्तम
मोठ्या बँका असणे हे देशासाठी चांगलं आहे. चीनकडे किती मोठ्या बँका आहेत ते पाहा, असंही पारेख म्हणाले. या चर्चेदरम्यान पारेख यांनी विमा क्षेत्रावर टीका करत ते चुकीच्या पद्धतीनं विकले जात असल्याचं म्हटलं.