Gold prices today collapse down by rs 4500 in 2 days silver rates crash | सोने-चांदीला स्वस्ताईची ‘लस’; चांदी १२ हजार, तर सोने ४ हजार रुपयांनी स्वस्त

सोने-चांदीला स्वस्ताईची ‘लस’; चांदी १२ हजार, तर सोने ४ हजार रुपयांनी स्वस्त

जळगाव : कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढून भावही वाढलेल्या सोने चांदीच्या भावात कोरोनाच्या लसीची घोषणा होताच मोठी घसरण झाली आहे. रशियाने लसीचा दावा करताच सट्टा बाजारातील खरेदीदारांनी विक्रीचा मारा सुरू केला व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. यामुळे बुधवार, १२ ऑगस्ट रोजी चांदीत एकाच दिवसात तब्बल बारा हजार रुपये तर सोन्यात चार हजार रुपयांनी घसरण झाली. परिणामी चांदी ७५ हजार ५०० रुपयांवरून थेट ६३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली तर सोने ५५,७०० रुपयांवरून ५१ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सट्टेबाजांमुळे अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात बुधवारीही याचे परिणाम दिसून आले व दिवसभरात सोने-चांदीचे भाव दोन वेळा बदलले.

कोरोनाच्या स्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूक वाढल्याने भाववाढ होत गेली. सोबतच सट्टा बाजारात अगोदर मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने भाववाढ झाली. आता कोरोना लसीची घोषणा झाल्याने खरेदीदारांनी विक्री वाढविली आहे. त्यामुळे भाव घसरू लागले आहे. या पूर्वी २०१२मध्ये चांदीत २० हजार रुपयांची घसरण झाली होती. मात्र ती तीन दिवसातील होती.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन

लसीच्या घोषणेनंतर विक्रीचा मारा कोरोनामुळे जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे सावट असल्याने सोने-चांदीच्या खरेदीकडे कल वाढला होता. त्या कोरोनाच्या लसीची रशियाने घोषणा करताच सट्टा बाजारात खरेदीदारांनी खरेदी थांबवून विक्रीचा मारा सुरू केला आहे.

त्यामुळे मंगळवारी ७५ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १२ हजार रुपयांनी घसरण होऊन ती बुधवारी ६३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

अशाच प्रकारे मंगळवारी ५५ हजार ७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात चार हजार रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण
सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराची स्थिती पाहता आतापर्यंतची चांदीची एकाच दिवसातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. या पूर्वी २०१२मध्ये मोठी भाववाढ होऊन ७५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचलेल्या चांदीत तीनच दिवसात थेट २० हजार रुपयांची घसरण झाली होती. मात्र त्या वेळी ती सहा ते आठ हजार अशी एका दिवसातील घसरण होती. मात्र आता एकाच दिवसात थेट १२ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gold prices today collapse down by rs 4500 in 2 days silver rates crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.