Gold Price Above 1 Lakh Rupees: आज पहिल्यांदाच सोन्याचा भाव १ लाख रुपयांवर पोहोचला आहे. या प्रसंगी देशातील दिग्गज बँकर उदय कोटक यांनी एक मनोरंजक गोष्ट शेअर केली, ज्याचा प्रत्येक भारतीय महिलेला अभिमान वाटेल. भारतीय गृहिणी जगातील सर्वात बुद्धिमान फंड मॅनेजर आहेत. सोन्याची कामगिरी हेच दर्शवते, असं उदय कोटक यांनी म्हटलं. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी एक पोस्ट शेअर केलीये.
त्याचबरोबर कर्ज वाढवण्याची आणि खर्च करण्याची भाषा करणारी सरकारं, अर्थतज्ज्ञ आणि मध्यवर्ती बँकांना भारताच्या या 'हाऊसवॉर्मिंग इकॉनॉमी'मधून खूप काही शिकण्यासारखं आहे, असंही उदय कोटक म्हणाले.
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी एमसीएक्सवर जून डिलिव्हरीसाठीचं सोनं ९८,७५३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं. म्हणजे एका दिवसात सुमारे १५०० रुपयांची वाढ झाली. जीएसटी न जोडता सोमवारी हा दर प्रति दहा ग्रॅम ९७,२०० रुपयांच्या आसपास होता.
The performance of gold over time highlights that the Indian housewife is the smartest fund manager in the world. Governments, central banks, economists, who support pump priming, high deficit funding, may need to take a leaf from India, a net importer of store of value forever!
— Uday Kotak (@udaykotak) April 22, 2025
भारतीय महिलांकडे २४ ते २५ हजार टन सोनं
भारतातील महिलांकडे सुमारे २४,००० ते २५,००० टन सोनं आहे, जे सुमारे २५ मिलियन किलो इतकं आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीवर आधारित टाइम्स ऑफ इंडियाच्या (डिसेंबर २०२४) अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे सोनं जगातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या सुमारे ११% आहे आणि तेही केवळ दागिन्यांच्या स्वरूपात! आता इतर देशांच्या सोन्याशी तुलना केली तर भारतातील महिलांकडे असलेलं सोनं जगातील टॉप ५ देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेकडे ८,००० टन, जर्मनीकडे ३,३०० टन, इटलीकडे २,४५० टन, फ्रान्सकडे २,४०० टन आणि रशियाकडे १,९०० टन आहे. या पाच देशांचं एकूण सोनं ही भारतातील महिलांकडे असलेल्या सोन्यापेक्षा खूपच कमी आहे.
भारतीय कुटुंबांकडे असलेलं एकूण सोने अमेरिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या एकत्रित सोन्यापेक्षा जास्त आहे. यासाठी दक्षिण भारत विशेष आहे कारण संपूर्ण देशातील एकूण देशांतर्गत सोन्यापैकी सुमारे ४०% सोनं या ठिकाणी आहे आणि एकट्या तामिळनाडूचं त्यात २८% योगदान आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, २०२०-२१ मध्ये भारतीय कुटुंबांकडे २१,००० ते २३,००० टन सोनं होतं, जे आता आणखी वाढलं आहे. हा सोन्याचा साठा केवळ आपला सांस्कृतिक वारसाच बनला नाही तर भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा ही एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे उपाध्यक्ष अविनाश गुप्ता यांनी, सोन्याचे दर अजून वाढू शकतात असा लोकांना विश्वास असल्याचं ईटीशी बोलाताना म्हटलं. जागतिक बाजारातही सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचत आहेत. कॉमेक्स गोल्डनं ३,४०० डॉलरपर्यंत पोहोचून नवा विक्रम प्रस्थापित केला, तर एमसीएक्स गोल्ड ९६,७७५ रुपयांवर पोहोचला.