Gold fell by Rs 4,000 in a month; What is the market trend? | Gold Rate: महिनाभरात सोने ४००० रुपयांनी गडगडले; काय सांगतोय बाजाराचा ट्रेंड?

Gold Rate: महिनाभरात सोने ४००० रुपयांनी गडगडले; काय सांगतोय बाजाराचा ट्रेंड?

कोरोना लसीचे वेध लागले आहेत. भारतातच तीन लसी अंतिम टप्प्यात आहेत. तर रशिया, अमेरिकेच्या दोन लसी पुढील महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट व्हायला लागली आहे. कोरोना महामारीमुळे गुंतवणूकदारांनी त्यांचा पैसा शेअर बाजारातून काढून सोन्यात गुंतवला होता. यामुळे सोन्याच्या दरांनी ५७०००ची ऐतिहासिक उंची गाठली होती. मात्र, आता सोन्याचे हे तेज आता कमी होऊ लागले आहे. 


भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याची चमक अचानक गायब होऊ लागल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. 


ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या आठवड्यात सोन्याचा ४ डिसेंबरचा वायदा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. शेवटच्या दिवशी सोन्यामध्ये ४११ रुपयांची घट नोंदविली गेली. गुरुवारी सोने 48517 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. हा दर सोन्याच्या उच्च पातळीपेक्षा 8200 रुपयांनी कमी आहे. 

4000 रुपयांची घसरण
नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ३० ऑक्टोबरला सोन्याचा दर 50699 रुपये प्रति १० ग्रॅम होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून 52167 रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला 48106 रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घट झाली आहे. पुढे कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसा काढून घेऊ लागले आहेत. 
MCX वर डिसेंबर डिलिव्हरीचे सोने (Gold MCX Price) 411 रुपयांनी स्वस्त झाले. तर फेब्रुवारीचे सोने 404 आणि एप्रिल डिलिव्हरीचे सोने 485 रुपयांनी स्वस्त झाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gold fell by Rs 4,000 in a month; What is the market trend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.