तीन परदेशी फंडांची खाती गोठवली; अदानी ग्रुपला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:09 AM2021-06-15T05:09:18+5:302021-06-15T05:09:29+5:30

एनएसडीएलची कारवाई : पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक

Frozen accounts of three foreign funds; blow to Adani Group | तीन परदेशी फंडांची खाती गोठवली; अदानी ग्रुपला धक्का

तीन परदेशी फंडांची खाती गोठवली; अदानी ग्रुपला धक्का

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये ४३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या तीन परदेशी फंडांची खाती नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीने (एनएसडीएल) ३१ मे रोजी वा त्यापूर्वी गोठविली असल्याने अदानी ग्रुपच्या समभागांमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झालेली दिसून आली. गुंतवणुकीबाबतची योग्य ती माहिती न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, गौतम अदानी यांनी मात्र खाती गोठविल्याचा इन्कार केला आहे.

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीने आपल्या संकेतस्थळावर तीन परदेशी फंडांची खाती गाेठविल्याची माहिती दिली आहे. अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंडस‌्, क्रेस्टा फंडस् आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंटस फंडस यांची ही खाती आहेत. या तीनही फंडांनी गौतम अदानी यांच्या चार कंपन्यांमध्ये ४३, ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारामध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे यात काही गडबड होत असल्याची शंका व्यक्त केली जात होती. या तीन परदेशी फंडांची खाती गोठविली गेल्यामुळे आता त्यांना शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाहीत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये अदानी समूहाने विमानतळे, बंदरे तसेच वीज कंपन्या मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे या कारवाईचा देशातील पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
परकीय गुंतवणूकदारांचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या परदेशी बँकांच्या सूत्रांनी एनएसडीएलने केलेली कारवाई माहिती असल्याचे स्पष्ट केले आहे. कस्टोडिअन 
याबाबत संबंधित खातेधारकांना सूचना देत असतात; मात्र त्यांच्याकडून काहीही कारवाई न झाल्याने खाती गोठविण्याची कारवाई झाली असावी. 

अदानींकडून मात्र इन्कार
आपल्या गुंतवणूकदारांची खाती गोठविल्याची बातमी कपोलकल्पित असून याबाबत आपल्याकडे लेखी स्पष्टीकरण असल्याचा दावा अदानी समूहातर्फे करण्यात आला आहे. हे तीनही परकीय फंड हे अदानी समूहाचे प्रमुख गुंतवणूकदार असून कंपनीच्या समभागांना कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वृत्तानंतर अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांच्या समभागांमध्ये सुमारे २५ टक्क्यांपर्यंत घसरण झालेली बघावयास मिळाली; मात्र दिवसाच्या उत्तरार्धामध्ये बाजार सुधारल्याने काही प्रमाणात या समभागांच्या किमतीही वाढल्या. सोमवारी अदानी एण्टरप्रायजेस (६.६ टक्के) अदानी पोर्टस‌ ॲण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (८.३८ टक्के), अदानी ग्रीन एनर्जी (४.१३ टक्के), अदानी टोटल गॅस व अदानी ट्रान्समिशन(प्रत्येकी ५ टक्के), तर अदानी पॉवर (४.९९ टक्के) या कंपन्यांचे समभाग घसरले.

n सकाळच्या सत्रात अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे समभाग घसरल्याने भांडवल मूल्य १ लाख कोटी रूपयांनी घसरले होते. मात्र, नंतर बाजार सावरू लागल्यानंतर किंमतींमध्ये काहीशी वाढ झाली. 
n दिवसअखेर कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य ५५ हजार कोटी रूपयांनी कमीच राहिले. मात्र, दिवसभरात त्यामध्ये ४५ हजार कोटींची वाढ झाली, हे विशेष.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Frozen accounts of three foreign funds; blow to Adani Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Adaniअदानी