मुंबई - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत आणि संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवत आहेत. हिटलरनेही युद्ध छेडले होते आणि ट्रम्पही युद्ध करत आहेत असं विधान भारतीय उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत उद्योगपती निरंजन हिरानंदानी म्हणाले की, ते आता हिटलर बनले आहेत. जगावर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिटलरने काय उपाय केले होते, तर युद्ध केले आणि हेदेखील युद्धच करत आहेत. एक ना एक दिवस आपल्यालाही त्यांच्यासोबत युद्ध करावे लागणार आहे. सर्वांनाच करावे लागेल. त्यांची ताकद जास्त आहे म्हणून ते हे करत आहेत असं त्यांनी सांगितले. आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हिरानंदानी यांनी जागतिक राजकारणावर भाष्य केले.
तसेच सध्याच्या काळात पाहायला गेले तर डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्रपती आहेत. हे युद्ध आहे जे त्यांनी व्हेनेझुएलाविरोधात पुकारले आहे. तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण पुढील महिन्यात ते ग्रीनलँडही ताब्यात घेतील. त्यानंतर कोलंबियावरही कब्जा करतील. शक्ती सर्वोच्च आहे हे त्यांनी दाखवून दिले. युद्धात ज्यादिवशी लक्ष्मण रेषा ओलांडतील त्यादिवशी सर्वनाश होईल. हे आपल्या गीतेत लिहिले आहे. ६ महिन्यात असेच होईल. पुढील दिवाळीपर्यंत हे होईल असंही उद्योगपती हिरानंदानी यांनी म्हटलं आहे.
जगात काय घडतंय?
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. यामुळे जागतिक राजकारणात मोठा खळबळ उडाली. विशेष म्हणजे त्याच्या काही तास आधीच चीनच्या दूतांनी मादुरो यांची भेट घेतली होती. निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर आणि बाजारावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याने चीनला मोठा झटका बसला आहे. त्यानंतर बुधवारीच अमेरिकेने रशियन झेंडे असणारे तेल टँकर मरीनेरा हे जहाज जप्त केले आहे. कॅरिबियन सागरातही अमेरिकन तटरक्षक दलाने व्हेनेझुएलाहून येणारा एक तेल टँकर रोखला. या सर्व घडामोडीमुळे जागतिक पातळीवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
