dabur india : डाबर ब्रँडची उत्पादने माहित नाही, असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. तुमच्याही घरात एखादं तरी उत्पादन तुम्ही नक्कीच वापरत असाल. तुम्ही देखील डाबरच्या उत्पादनाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. देशातील सुप्रसिद्ध एफएमसीजी कंपनी डाबरने आपली काही उत्पादने बंद करण्यचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत ते चहा, प्रौढ आणि शिशु डायपर आणि सॅनिटायझिंग उत्पादनांसारख्या श्रेणीतून बाहेर पडणार आहेत. कंपनीचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
डाबर अनेक उत्पादने का बंद करणार?
नुकतेच डाबर इंडियाचे तिमाही निकाल समोर आले. यात अनेक विभागात सुमार कामगिरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. अहवालानुसार, मल्होत्रा म्हणाले की, डाबरच्या महसुलात या विभागांचा वाटा १ टक्क्यांपेक्षा कमी आहे, जो आर्थिक वर्ष २५ मध्ये १३,११३.१९ कोटी रुपये होता. त्यामुळेच यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. डाबर मुख्य ब्रँडमध्ये गुंतवणूक करत राहणार आहे. आरोग्य आणि निरोगीपणाच्या क्षेत्रात आता ताकद लावली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.
ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्सवर लक्ष केंद्रित करणार
डाबरने शहरी आणि ग्रामीण भारतात प्रभावीपणे विस्तार करण्याबरोबरच ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स आणि आधुनिक व्यापार यासारख्या उदयोन्मुख माध्यमांवर दुप्पट काम करण्याची योजना आखली आहे. सीईओ म्हणाले की आम्ही ई-कॉमर्स, क्विक कॉमर्सवर आणि आधुनिक व्यापार यासारख्या उदयोन्मुख माध्यमांवर भर देणार आहोत. आम्ही चांगल्या ROI (गुंतवणुकीवरील परतावा) साठी स्टॉकिस्ट्सचे एकत्रीकरण, शहरी GT चॅनेलची सेवा देण्याचा खर्च कमी करणे आणि डिजिटल साधनांचा वापर वाढवणे यावर देखील लक्ष केंद्रित करू.
वाचा - तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
७ ब्रँडचा विस्तार करणार
या धोरणानुसार, कंपनी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक विक्री असलेल्या ७ ब्रँडचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. डाबर रेड, रिअल, डाबर चवनप्राश, डाबर हनी, हाजमोला, डाबर आमला, ओडोनिल आणि वाटिका. या ७ उत्पादनांचा महसूलात ७० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. "आम्ही कोणतीही तडजोड न करता गुंतवणुकीद्वारे या ब्रँड्सची वाढ करत राहू, ज्यामुळे बाजारातील वाटा वाढेल."