सिबिल स्कोअर खराब असल्यानं कर्ज मिळणं खूप अवघड जातं. पण त्यामुळं एखाद्याला नोकरी नाकारली जाऊ शकते का? होय, हे एका व्यक्तीच्या बाबतीत घडले. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सिबिल स्कोअर खराब असल्यानं एका व्यक्तीला नोकरी देण्यास नकार दिला. ही व्यक्ती सामान्य व्यक्ती नसून एचडीएफसी बँकेचे माजी डेप्युटी मॅनेजर होते.
तुम्ही कोणती कर्ज घेतली आहेत, ती वेळेवर फेडली आहेत की नाही हे सिबिलच्या माध्यमातून समजून येतं. मद्रास उच्च न्यायालयानेही एसबीआयचा हा निर्णय कायम ठेवला आहे. बँकेत काम करणाऱ्यांनी पैशाच्या बाबतीत चांगलं असणे अत्यंत गरजेचं आहे, असं न्यायालयानं म्हटलंय. या प्रकरणात, जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगला असायला हवी, असंही सांगण्यात आलं. क्रेडिट हिस्ट्री म्हणजे तुम्ही यापूर्वी कधी कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही वेळेवर फेडलं आहे की नाही याची माहिती.
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
काय आहे प्रकरण?
कोर्टाच्या म्हणण्यानुसार, नोकरी न मिळालेल्या या व्यक्तीनं आपल्या लहान भावाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी काही पर्सनल लोन घेतलं होतं. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्दैवाने त्यांच्या भावाचा अपघात झाला. यामुळे व्यवसायात तोटा झाला आणि कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या. २०१६ ते २०२१ या कालावधीत त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये अनेकदा कर्जाची परतफेड करण्यास उशिर झाला, देयकं रखडली आणि अनेक कर्ज राईट ऑफ झाली. राइट ऑफ म्हणजे बँकेने कर्ज परत मिळणार नाही, असं गृहित धरलं. शिवाय त्याच्या क्रेडिटबाबत त्यांना ५० पेक्षा जास्त वेळा प्रश्न विचारण्यात आले.
कोणत्या पदासाठी झालेली निवड
ही व्यक्ती एसबीआय सीबीओ (सर्कल बेस्ड ऑफिसर) परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झाली होती. मार्च २०२१ मध्ये त्यांना नोकरीचं पत्रही मिळालं. मात्र, नंतर त्यांचा सिबिल रिपोर्ट खराब आल्यानं एसबीआयनं नोकरीची ऑफर मागे घेतली.
नोकरी रद्द झाल्यानंतर त्या व्यक्तीनं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी एसबीआयच्या एचआर विभागाच्या पत्राचा हवाला दिला. नोकरीवर रुजू होण्यापूर्वी लोन डिफॉल्टला दुरुस्त करता येईल, असं त्या पत्रात लिहिलं होतं. मात्र, न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली. क्रेडिट रिपोर्टच्या आधारे नोकरी देण्याचा अधिकार एसबीआयला आहे, असं न्यायालयानं म्हटलं. यावरून नोकरी करताना क्रेडिट स्कोअर किती महत्त्वाचा असतो हे दिसून येते.
काय म्हटलं न्यायालयानं?
ज्या उमेदवारांचा कर्ज परतफेडीचा इतिहास खराब आहे आणि ज्यांचा सिबिल स्कोअर खराब आहे, ते नोकरीसाठी पात्र नाहीत, असा निर्णय बँकेनं विचारपूर्वक घेतला आहे, असं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं. याचं कारण असं असू शकतं की बँकिंग व्यवसायात कर्मचाऱ्यांना जनतेच्या पैशातून काम करावं लागतं आणि म्हणूनच आर्थिक शिस्त राखणं अत्यंत आवश्यक आहे.