संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पेट्रोल, डिझेलच्या किमतीपेक्षा आकाशात भरारी घेणाऱ्या विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर कमी आहेत, असे सांगितले तर विश्वास बसणे कठीण आहे; पण हे खरे आहे. औरंगाबादेत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९८ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या ‘एटीएफ’ इंधनाचा भाव मात्र प्रतिलिटर ६० रुपये आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई, दिल्ली, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये काही तासांतच औरंगाबादकरांना पोहोचता येत आहे.
विमानांच्या इंधनासाठी चिकलठाणा विमानतळावर दोन स्टेशन्स आहेत. यात एका स्टेशनची ७० हजार लिटर आणि दुसऱ्या स्टेशनची २ लाख १० हजार लिटर क्षमता आहे. साधारण महिन्याला ४० ते ५० विमानांमध्ये याठिकाणी इंधन भरले जाते. दररोज ५० विमानांचे उड्डाण झाले तरीही दोन्ही स्टेशन्स इंधन भरू शकतील, एवढी मोठी क्षमता आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण झाले आहेत. त्या तुलनेत विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी म्हणजे कंपनीसाठी हा दर कमी-अधिक असतो; पण विमानात एकाच वेळी हजारो लिटर इंधन भरावे लागते.
ए.टी.एफ. अर्थात पांढरे पेट्रोल
विमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले असते. त्यास ‘पांढरे पेट्रोल’ असेही म्हटले जाते. ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) असे त्याचे तांत्रिक नाव आहे. हवामान थंड असो वा गरम, विमानातले इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवीत राहते. ते गरमीमुळे उडून जात नाही की थंडीमुळे गोठत नाही.
विमानतळावर विमानात टँकरने इंधन भरले जाते. यासाठी आपल्याकडे दोन कंपन्यांची सुविधा आहे. औरंगाबादला व्हॅट ५ टक्के असल्याने जवळपास सर्व विमाने इथे इंधन भरतात. त्याचा दर साधारण ६० रुपये लिटर आहे.- विनायक कटके, सहायक महाप्रबंधक, चिकलठाणा विमानतळ
