Carefree businessman concerned with storage of 20 carat jewelry | २० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित

२० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित

- अविनाश कोळी
सांगली : बीआयएस हॉलमार्कची १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी मानके ठरवण्यात आली आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. २० कॅरेटला हॉलमार्क मान्यता नसल्यामुळे येत्या वर्षभरात या दागिन्यांची विक्री न झाल्यास ती मोडीत काढावी लागणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा सराफ असोसिएशनने आता २० कॅरेटच्या दागिन्यांनाही हॉलमार्क मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे.

सांगली जिल्ह्याात सुमारे दोन हजाराच्या घरात सराफ व्यावसायिक आहेत. याठिकाणची उलाढालही मोठी आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये २० कॅरेट दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे अशा दागिन्यांचा मोठा साठा शिल्लक आहे. हॉलमार्कचे बंधन १५ जानेवारी २०२० पासून लागू झाले असून २० कॅरेटच्या दागिण्यांचा शिल्लक साठा संपविण्यासाठी शासनाने एक वर्षाची मुदत दिली आहे, म्हणजेच १५ जानेवारी २०२१ पर्यंतच हे दागिने विकता येतील. परंतु सध्याचा दागिण्यांचा साठा पाहिल्यास त्याची वर्षभरात संपूर्ण विक्री होईल, असे सराफ व्यावसायिकांना वाटत नाही. दागिने घडविण्याची प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे पुढीलवर्षी अशाप्रकारचे शिल्लक दागिने वितळविण्याची वेळ आली, तर कोट्यवधींचा तोटा सराफ व्यावसायिकांना सहन करावा लागेल.

२० कॅरेटच्या दागिन्यांचा मोठा साठा जिल्ह्यात आहे. मंदीच्या काळात वर्षभरात या दागिन्यांची विक्री करणे कठीण असून, वर्षभराने ते वितळविण्याची वेळ आली तर, फार मोठे नुकसान सोसावे लागेल.
- किशोर पंडित, उपाध्यक्ष,
महाराष्ट्र सराफ असोसिएशन

हॉलमार्क केंद्रे वाढविण्याची गरज
हॉलमार्कची १२ केंद्रे जिल्ह्यात आहेत. विशेषत: ती शहरी भागातच आहेत. तालुक्याच्या ठिकाणी हॉलमार्कचे केंद्र उभारल्यास ग्रामीण सराफांना त्याचा लाभ होऊ शकतो. जिल्ह्यातील सोने-चांदी दागिन्यांची उलाढाल मोठी असल्याने आणखी हॉलमार्क केंद्रे वाढविण्याची आवश्यकता आहे.
 

Web Title: Carefree businessman concerned with storage of 20 carat jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.