Stock Market Holidays: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमुळे गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये कोणताही व्यवहार होणार नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
NSE ने आपल्या नवीन परिपत्रकात म्हटलंय की, पूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेत अंशतः बदल करून आता १५ जानेवारी २०२६ रोजी कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये ट्रेडिंग हॉलिडे घोषित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमुळे ही सुट्टी देण्यात आलीये. यापूर्वी, एक्सचेंजनं म्हटलं होतं की १५ जानेवारीला व्यवहार सुरू राहतील आणि फक्त सेटलमेंट हॉलिडे असेल. मात्र, आता नवीन आदेशानंतर संपूर्ण दिवस बाजार बंद राहील.
कोणत्या सेगमेंटमध्ये व्यवहार होणार नाहीत?
नवीन अधिसूचनेनुसार, १५ जानेवारी रोजी BSE आणि NSE दोन्हीवर इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्हज, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLB), करन्सी डेरिव्हेटिव्हज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हजमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. याशिवाय, कमोडिटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये सकाळचं सत्र देखील बंद राहील.
महाराष्ट्र सरकारची सार्वजनिक सुट्टी
महानगरपालिका निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 'नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट' (Negotiable Instruments Act) अंतर्गत ही सुट्टी घोषित करण्यात आली आहे. ही सुट्टी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये लागू असेल. यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचाही समावेश आहे, जिथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका होत आहेत.
मुंबईत आदेश पूर्णपणे लागू राहणार
ही सुट्टी संपूर्ण मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये लागू असेल. सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका आणि इतर संस्था बंद राहतील. हा आदेश मुंबईत नोंदणीकृत असलेल्या परंतु कामानिमित्त शहराबाहेर राहणाऱ्या मतदारांनाही लागू असेल, जेणेकरून ते मतदानाचा हक्क बजावू शकतील. महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. यापूर्वी २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीही शेअर बाजार बंद ठेवण्यात आला होता.
२०२६ मध्ये किती दिवस शेअर बाजार बंद?
२०२६ या वर्षात शेअर बाजार एकूण १६ दिवस बंद राहतील. यापैकी चार सुट्ट्या शनिवार किंवा रविवारी येत आहेत, जेव्हा बाजार आधीच बंद असतात. मार्च २०२६ मध्ये सर्वाधिक सुट्ट्या असतील. या महिन्यात ३ मार्च (होळी), २६ मार्च (श्रीराम नवमी) आणि ३१ मार्च (श्री महावीर जयंती) रोजी बाजार बंद राहतील. दुसरीकडे, फेब्रुवारी, जुलै आणि ऑगस्टमध्ये कोणतीही प्रभावी सुट्टी नसेल, कारण या महिन्यांतील अनेक राष्ट्रीय सुट्ट्या वीकेंडला येत आहेत.
