Debt Free : अलीकडच्या काळात मध्यमवर्गीय आणि कर्ज हे जणू एक समीकरणच झालं आहे. तुमच्याही आसपास एकही व्यक्ती असा सापडणार नाही, ज्याने कधी कर्ज घेण्याचा विचार केला नसेल. त्यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. मात्र, कर्ज फेडण्याच्या नादात तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यासोबत तडजोड तर करत नाही ना? एका ३० वर्षीय तरुणाने त्याचे गृहकर्ज आणि कार लोन फेडल्यानंतर आपल्या सीएला आनंदाने ही बातमी दिली. सीए यांनी या निर्णयाला एक मोठी चूक म्हटलं.
कर्ज फेडण्यासाठी तरुणाने काय चूक केली?
सीए अभिषेक वालिया यांनी लिंक्डइनवर या घटनेबद्दल सांगितले. त्यांच्या मते, कर्ज लवकर चुकते करण्यासाठी त्या तरुणाने अनेक मोठे आर्थिक निर्णय घेतले.
- सर्व म्युच्युअल फंड विकले.
- आपत्कालीन निधी पूर्णपणे रिकामा केला.
- निवृत्तीचे नियोजन काही वर्षांसाठी पुढे ढकलले.
- ईएमआय संपवण्याच्या घाईत त्याने आपली संपूर्ण आर्थिक सुरक्षाच नष्ट केली. कर्जमुक्त झाला खरा, पण भविष्यातील संकटांसाठी कोणतीही तरतूद ठेवली नाही.
आर्थिक सुरक्षा संपवणे म्हणजे मोठा धोका
सीए वालिया यांनी स्पष्ट केले की, जर अचानक कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आली, नोकरी गेली, किंवा कुटुंबात मोठे संकट आले, तर या व्यक्तीला पुन्हा कर्ज घ्यावे लागेल. यावेळी त्याच्या मदतीला येणारी कोणतीही गुंतवणूक किंवा आपत्कालीन निधी शिल्लक नाही.
याचा अर्थ असा की, केवळ कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे नव्हे. कधीकधी कोणत्याही किंमतीवर कर्ज फेडण्याऐवजी, त्या कर्जाला तरलता, वाढ आणि भविष्यातील संरक्षणासोबत संतुलित करणे अधिक महत्त्वाचे असते. पैसा फक्त आजच्या समाधानासाठी नाही, तो उद्यासाठी एक ढाल देखील आहे.
श्रीमंत लोक 'वेल्थ' कशी तयार करतात?
सीए नितीन कौशिक यांनी एका ट्वीटमध्ये मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांच्या आर्थिक धोरणांमधील फरक स्पष्ट केला आहे:
मध्यमवर्गीय लोकांचे धोरण | श्रीमंत लोकांचे धोरण |
फक्त कमावणे आणि बचत करणे. | कमावणे आणि गुंतवणे. |
सर्व बचत एकाच खात्यात ठेवणे. | मालमत्ता ट्रस्ट किंवा कंपनीच्या नावाने ठेवणे. |
नोकरी गेली तर सगळे काही धोक्यात. | बिझनेस 'होल्डिंग फर्म्स'द्वारे नियंत्रित, जेणेकरून एक युनिट बुडाल्यास कुटुंबाची संपत्ती सुरक्षित राहते. |
कर्ज स्वतःच्या नावावर घेणे. | कंपन्यांद्वारे कर्ज घेणे, ज्यामुळे वैयक्तिक जबाबदारी कमी होते. |
श्रीमंत लोक प्रत्येक मोठ्या जोखमीचा विमा काढतात आणि त्यांची मालमत्ता विविध संस्थांमध्ये विखुरलेली असते, ज्यामुळे अदृश्य सुरक्षा कवच तयार होतात.
वाचा - सोने विक्रमी पातळीवर! पण 'हा' बुडबुडा कधीही फुटेल; जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मार्गनचा इशारा
मध्यमवर्गीयांसाठी मोठा आर्थिक धडा
- फक्त जास्त उत्पन्न मिळवणे हा खरा 'वेल्थ हॅक' नाही, तर तुम्ही जी संपत्ती निर्माण केली आहे, तिचे संरक्षण कसे करायचे, हे शिकणे महत्त्वाचे आहे.
- प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीने खालील धोरणे अवलंबल्यास दीर्घकाळ टिकणारी आर्थिक सुरक्षा मिळू शकत.
- मालमत्तेचे विविधीकरण करणे.
- प्रत्येक मोठ्या आर्थिक जोखमीचा विमा काढणे.
- वैयक्तिक आणि व्यावसायिक आर्थिक व्यवहार वेगळे ठेवणे.
- हा छोटासा बदल तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी मोठे पाऊल ठरू शकतो.