credit card limit : आता क्रेडिट कार्ड वापरणे सामान्य गोष्ट झाली आहे. तरुणांमध्ये याची प्रचंड क्रेझ दिसते. क्रेडिट कार्ड तुम्हाला मुक्तपणे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लोक क्रेडिट कार्डने मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. काही लोक त्यांची युटिलिटी बिले क्रेडिट कार्डद्वारे भरतात. आजकाल असे अनेक थर्ड पार्टी ॲप्स आले आहेत, ज्याद्वारे लोक घराचे भाडे, देखभाल शुल्क किंवा शिक्षण शुल्क भरण्याच्या नावावर पैसे स्वतःकडे ट्रान्सफर करतात. मात्र, क्रेडिट कार्ड जसे आपात्कालीन स्थितीत मदतीला येते. त्याउलट आपल्या चुकीच्या वापरामुळे ते गोत्यातही आणू शकते.
अनेक लोक कर्जबाजारी
क्रेडिट कार्ड लोकांच्या आर्थिक गरजा तर पूर्ण करत आहेतच, पण मोठ्या प्रमाणात लोक कर्जाच्या जाळ्यातही अडकत आहेत. क्रेडिट कार्डद्वारे सतत मोठी खरेदी करण्याची आणि स्वतःकडे रोख रक्कम हस्तांतरित करण्याच्या सवयीमुळे कर्ज वाढत आहे. अनेक वेळा लोकांना पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डचे बिल भरावे लागते. या सगळ्यामुळे ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर बिघडतो. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेची किती टक्के रक्कम खर्च करावी? याचं भान तुम्हाला असायला हवं.
क्रेडिट कार्डच्या खर्चाची मर्यादा कशी पाळावी?
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा जास्त वापर करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. तुम्ही क्रेडिट कार्ड मर्यादेच्या १० ते १५ टक्के वापरणे आदर्श समजले जाते. मर्यादेच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर स्थिर होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा १.५ लाख रुपये असेल, तर तुम्ही दरमहा ४५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये. तसेच, वेळोवेळी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत राहा. तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरलाही हानी पोहोचू शकते. जुन्या क्रेडिट कार्ड्सचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बऱ्याच काळापासून वापरत नसाल तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.