UPI Payment : आजकाल यूपीआय (UPI) पेमेंट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पूर्वी लोक पैशांचं पाकीट घेऊन घराबाहेर पडत आता. एक स्मार्टफोन पुरेसा आहे. भाजीच्या जुडीपासून मॉलमध्ये शॉपिंग करण्यापर्यंत, सर्वत्र यूपीआयचा वापर सर्रास केला जातो. यामुळे पैसे पाठवणे आणि स्वीकारणे खूप सोपे झाले आहे. पण, या सोयीस्कर प्रणालीमध्ये एक छोटीशी चूक तुमच्या बँक खात्याला रिकामे करू शकते. ही चूक कोणती आहे आणि त्यापासून कसे वाचावे, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
सर्वात मोठी चूक: 'रिमोट ॲक्सेस ॲप्स' आणि अनोळखी लिंकवर क्लिक करणे
यूपीआय फसवणुकीमध्ये सर्वात सामान्य आणि धोकादायक चूक म्हणजे अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून 'रिमोट ॲक्सेस ॲप्स' जसे की Anydesk, TeamViewer, QuickSupport इत्यादी डाउनलोड करणे.
कसे होते हे सायबर अटॅक?
- फसवणूक करणारे तुम्हाला फोन करतात: अनेकदा फसवणूक करणारे लोक बँक अधिकारी, कस्टमर केअर प्रतिनिधी किंवा सरकारी योजनेचे अधिकारी असल्याचा दावा करतात.
- गोड बोलून जाळ्यात ओढतात: ते तुम्हाला एखादी समस्या सोडवण्यासाठी, रिवॉर्ड मिळवण्यासाठी किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करत असल्याचा बहाणा करतात.
- अनोळखी ॲप डाउनलोड करायला लावतात: ते तुम्हाला त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सांगतात आणि तुमच्या फोनवर Anydesk, TeamViewer, किंवा QuickSupport सारखे रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करायला सांगतात.
- तुमच्या फोनचा ताबा घेतात: एकदा तुम्ही हे ॲप डाउनलोड करून त्यांना ॲक्सेस दिला की, ते तुमच्या फोनचा पूर्ण ताबा घेतात.
- बँक खात्यातून पैसे गायब: यानंतर, ते सहजपणे तुमच्या बँक ॲपमध्ये जातात आणि तुमच्या खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतात. तुम्हाला याची कल्पनाही येत नाही आणि तुमचे खाते रिकामे होते.
फक्त एका क्लिकने होते मोठे नुकसान
याशिवाय, तुम्हाला कोणत्याही अज्ञात नंबरवरून किंवा व्यक्तीकडून आलेल्या मेसेजमधील संदिग्ध लिंकवर क्लिक करणेही धोकादायक ठरू शकते. अशा लिंक्सवर क्लिक केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो किंवा तुमची गोपनीय माहिती (उदा. बँक डिटेल्स, पासवर्ड) चोरीला जाऊ शकते. अनेकदा फसवणूक करणारे तुम्हाला 'तुम्ही लॉटरी जिंकली आहे' किंवा 'तुम्हाला बँकेकडून रिवॉर्ड मिळाला आहे' असे मेसेज पाठवून अशा लिंकवर क्लिक करायला लावतात.
या धोक्यांपासून स्वतःला कसे वाचवाल?
- अनोळखी ॲप्स डाउनलोड करू नका: कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून Anydesk, TeamViewer किंवा QuickSupport सारखे रिमोट ॲक्सेस ॲप्स कधीही डाउनलोड करू नका. बँक किंवा कोणतीही सरकारी संस्था तुम्हाला असे ॲप्स डाउनलोड करायला सांगत नाही.
- संदिग्ध लिंक्सवर क्लिक करू नका: अनोळखी मेसेजेसमधील किंवा ईमेलमधील कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
- ओटीपी (OTP) शेअर करू नका: तुमचा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका, अगदी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीसोबतही नाही. ओटीपी ही तुमच्या व्यवहाराची अंतिम सुरक्षा भिंत आहे.
- यूपीआय पिन (UPI PIN) गुप्त ठेवा: तुमचा यूपीआय पिन नेहमी गोपनीय ठेवा आणि तो कोणासोबतही शेअर करू नका.
- वेबसाइटची खात्री करा: जर तुम्हाला एखाद्या कंपनीकडून किंवा बँकेकडून मेसेज आला असेल, तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहितीची पडताळणी करा.
- फक्त 'स्कॅन अँड पे' (Scan & Pay) वापरा: पैसे पाठवण्यासाठी नेहमी 'स्कॅन अँड पे' (Scan & Pay) चा पर्याय वापरा, जिथे तुम्ही QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता.
वाचा - पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
यूपीआय पेमेंट सोपे आणि जलद असले तरी, त्याचा वापर करताना नेहमी सावध राहा. तुमची छोटीशी खबरदारी तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते.