Ponzi Scheme : "दोन दिवसांत पैसे दुप्पट", "काहीही न करता महिना लाखांची कमाई" किंवा "घरबसल्या श्रीमंत व्हा"... वर्तमानपत्र किंवा टीव्हीवर आपण अशा बातम्या अनेकदा वाचतो. यालाच अर्थविश्वात 'पोंझी स्कीम' म्हटले जाते. आजच्या डिजिटल युगात क्रिप्टो स्कॅमपासून ते ऑनलाइन फसवणुकीपर्यंत सर्वत्र हेच मॉडेल वापरले जाते. पण, या प्रकाराला 'पोंझी' हेच नाव का पडले? हे नाव एका अशा माणसाचे आहे, ज्याने केवळ एका 'कुपन'च्या जोरावर संपूर्ण जगाला वेड लावले होते.
कोण होता चार्ल्स पोंझी?
१८८२ मध्ये इटलीत जन्मलेल्या चार्ल्स पोंझी यांचा हा प्रताप आहे. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेला चार्ल्स नंतर गरिबीत आला, पण त्याच्या डोक्यात पुन्हा श्रीमंत होण्याचे खूळ कायम होते. १९०३ मध्ये जेव्हा तो अमेरिकेत पोहोचला, तेव्हा त्याच्या खिशात फक्त अडीच डॉलर्स होते. पण त्याचे स्वप्न मात्र करोडोंचे होते.
तो 'जादूचा मंत्र'
मॉन्ट्रियलमधील एका बँकेत काम करत असताना चार्ल्सने पाहिले की, बँकेचा मालक जुन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांचा वापर करत होता. व्यवसाय करण्यापेक्षा 'गोड कथा' विकणे अधिक फायदेशीर आहे, हा धडा त्याने तेथेच शिकला.
एका कुपनने बदलले नशीब
१९१९ मध्ये चार्ल्सला स्पेनमधून एक पत्र आले, ज्यात 'इंटरनॅशनल रिप्लाय कुपन' होते. हे कुपन एका देशात स्वस्तात खरेदी करून दुसऱ्या देशात महागड्या दराने विकता येत असे. हा व्यवहार कायदेशीर होता, पण त्यात प्रचंड गुंतागुंत होती. चार्ल्सने याच व्यवहाराचा आधार घेऊन एक बनावट योजना आखली. त्याने लोकांना आश्वासन दिले की, "तुमच्या पैशातून मी हे कुपन्स खरेदी करेन आणि अवघ्या ४५ दिवसांत तुम्हाला ५०% नफा मिळवून देईन."
मानसिक सापळा आणि लालसा
चार्ल्सला मानसशास्त्र चांगले ठाऊक होते. त्याने सुरुवातीच्या काही गुंतवणूकदारांना खरोखरच ५०% नफा परत केला. यामुळे लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला. "पैसे दुप्पट होतात" ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि लोक आपली आयुष्यभराची पुंजी घेऊन त्याच्याकडे धावू लागले. एका टप्प्यावर चार्ल्स दररोज सुमारे २,५०,००० डॉलर्स जमा करत होता.
फुगा फुटला आणि सत्य समोर आले
त्या काळातील आर्थिक पत्रकार क्लेरन्स बॅरन यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले की, जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात 'कुपन्स' अस्तित्वातच नाहीत जेवढा चार्ल्स दावा करत होता. गणित पूर्णपणे चुकीचे होते. मात्र, लोकांच्या डोळ्यावर लालसेची पट्टी होती. अखेर जेव्हा ही योजना कोलमडली, तेव्हा अनेक बँका बुडाल्या आणि हजारो लोक रस्त्यावर आले.
चार्ल्स पोंझीने नंतर कबूल केले की, तो गणितात कच्चा होता आणि त्याचे संपूर्ण साम्राज्य केवळ हवेत होते. आज शंभर वर्षांनंतरही नाव बदलून, स्वरूप बदलून चार्ल्स पोंझीचे 'भूत' गुंतवणूकदारांना लुटत आहे.
