Self-Construction Home Loan : अनेक लोकांचं स्वप्न असतं की, आपलं हक्काचं घर असावं, तेही आपल्या मनाप्रमाणे बांधलेलं. विशेषतः लहान शहरांमध्ये अजूनही अनेक लोक स्वतःची जमीन घेऊन त्यावर घर बांधण्याला प्राधान्य देतात. जर तुम्हीही असं स्वतःचं घर बांधण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याच्या तयारीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' म्हणजेच स्वयं-बांधकाम गृहकर्जाबद्दल सविस्तर माहिती देत आहोत, जे वैयक्तिक कर्जापेक्षा एक चांगला आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतं.
स्वयं-बांधकाम गृह कर्ज म्हणजे काय?
हे एक खास प्रकारचं कर्ज आहे, जे अशा व्यक्तींना दिलं जातं ज्यांच्याकडे आधीच स्वतःची जमीन आहे आणि त्यांना त्यावर घर बांधायचं आहे. हे कर्ज तयार घर खरेदी करण्यासाठी नसतं, तर ते फक्त 'घर बांधण्यासाठी' घेतलं जातं. या कर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे, यात पैसे तुम्हाला एकाच वेळी दिले जात नाहीत, तर बांधकामाच्या प्रगतीनुसार हप्त्यांमध्ये दिले जातात.
प्रत्येक हप्ता देण्यापूर्वी, बँक नियोजित योजनेनुसार काम होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी जागेची तपासणी करते. साधारणपणे, बँका एकूण बांधकाम खर्चाच्या ७५% ते ९०% पर्यंत कर्ज देतात.
कर्जासाठी कोण पात्र?
हे कर्ज पगारदार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक यांसह सर्व पात्र अर्जदारांना मिळू शकतं.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ७५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- जमिनीची मालकी: कर्जासाठी तुमच्याकडे जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. जमीन तुमच्या नावावर नोंदणीकृत असावी आणि त्यावर कोणताही कायदेशीर वाद नसावा.
- किमान मासिक उत्पन्न: अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न २५,००० रुपये असावे.
- मंजूर नकाशा: घर बांधण्यासाठी तुमच्याकडे बांधकाम विभागाकडून मंजूर केलेला नकाशा असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
स्वयं-बांधकाम गृह कर्जासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील.
- ओळखपत्र: पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स.
- पत्त्याचा पुरावा: वीज/पाणी/गॅस बिल, पासपोर्ट, भाडे करार इत्यादी.
- जमिनीच्या मालकीची कागदपत्रे: नोंदणीकृत विक्रीपत्र, मालकी हक्कपत्र, भार प्रमाणपत्र, मालमत्ता कर पावती.
- नकाशा : बांधकामासाठी मंजूर केलेला नकाशा.
- उत्पन्न प्रमाणपत्र: पगार स्लिप किंवा आयकर रिटर्न (ITR) विवरणपत्र.
- बँक स्टेटमेंट: मागील ३ ते ६ महिन्यांचे बँक खाते स्टेटमेंट.
- बांधकाम खर्चाचा अंदाज: सिव्हिल इंजिनिअर किंवा आर्किटेक्टने प्रमाणित केलेला तपशीलवार खर्च अंदाज.
व्याजदर आणि इतर शुल्क
या कर्जावरील व्याजदर नियमित गृहकर्जांसारखेच असतात. परंतु, काहीवेळा थोडे जास्त असू शकतात. ते साधारणपणे ७.५% ते १९% पर्यंत असतात.
वाचा - भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
प्रक्रिया शुल्क : कर्जाच्या रकमेच्या ०.५% ते २% पर्यंत प्रक्रिया शुल्क लागू होते.
स्थळ तपासणी शुल्क : बँक वेळोवेळी बांधकामाची प्रगती तपासण्यासाठी शुल्क आकारू शकते.