RBI MPC Meeting : वाढत्या महागाईत कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या कर्जदाराची आरबीआयने निराशा केली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दर कमी करेल अशी आशा सर्वांना होती. आज आरबीआयची चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) द्वैमासिक आढावा बैठकीतील निर्णय जाहीर करण्यात आले. यात आरबीआयने सलग ११व्यांदा रेपो दरात कोणतेही बदल केले नाहीत. परिणामी तुमचा ईएमआय स्वस्त होणार नाही. पण, आणखी एका निर्णयाने तुमच्या हातात पैसा येण्याचा एक मार्ग खुला झाला आहे.
RBI कडून CRR मध्ये कपात
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. सीआरआर ४.५० टक्क्यांवरून ४ टक्के करण्यात आला आहे. रोख राखीव प्रमाणातील कपात २ टप्प्यांत लागू केली जाईल. यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये १.१६ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड येईल. याचा फायदा म्हणजे बँकांना कर्ज देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा मिळणार आहे.
रोख राखीव प्रमाण (CRR) म्हणजे काय?
प्रत्येक बँकेला त्यांच्या एकूण ठेवींचा काही भाग रिझर्व्ह बँकेकडे राखीव म्हणून ठेवावा लागतो. या भागाला बँकेचा CRR म्हणतात. ही टक्केवारी ४.५ होती. बँकिंग व्यवस्थेतील तरलता नियंत्रित करणे, चलनवाढीचे व्यवस्थापन करणे आणि अत्याधिक कर्जाला आळा घालणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जर महागाई जास्त असेल तर आरबीआय सीआरआर वाढवते, जेणेकरून बँकांकडे कर्ज देण्यासाठी कमी पैसे उपलब्ध असतात. असे केल्याने बाजारातील पैशाचा ओघ कमी होतो आणि किंमती कमी होतात. परंतु, जेव्हा आर्थिक वाढ मंदावते, जसे सध्या होत आहे, तेव्हा आरबीआय CRR कमी करू शकते. यामुळे, बँकांना अधिक पैसे उपलब्ध होतात, जे ते कर्जाच्या स्वरूपात वितरित करू शकतात. लोकांच्या आणि उद्योगांच्या हातात अधिक पैसा आल्याने अर्थव्यवस्थेचे चाक सुरळीतपणे फिरू लागते.
सीआरआरमध्ये कपात केल्याने काय होईल?
जर RBI ने सीआरआर ५० बेसिस पॉइंट्स (bps) म्हणजेच ०.५ टक्के कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने बँकिंग सिस्टीममध्ये १.१ लाख कोटी ते १.२ लाख कोटी रुपयांचा निधी मोकळा होईल. त्याचवेळी, जर २५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.२५ टक्के कपात केली असती, तर ५५,००० कोटी ते ६०,००० कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होईल. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर ठेवण्यासाठी आरबीआयनेह अलीकडेच विदेशी चलन बाजारात हस्तक्षेप केला आहे. सीआरआर कपात देखील यातून उद्भवणाऱ्या आव्हानांचा समतोल साधण्यात मदत करू शकते.