Silver Loan Eligibility : आयुष्यात आर्थिक आणीबाणी आल्यास, आपण सोने गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेऊ शकतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवून बँक कर्ज देईल का, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो. आता याच प्रश्नाचे उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमधून मिळाले आहे.
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, १ एप्रिल २०२६ पासून सर्व बँका आणि नियामकांनी नियंत्रित केलेले कर्जदार सोन्याप्रमाणे चांदीही गहाण ठेवून कर्ज देऊ शकतील. यामुळे सामान्य नागरिकांना कर्ज घेण्यासाठी आणखी एक सोपा आणि महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
कर्ज कोणावर मिळेल, कोणावर नाही?
बँकांना सोने आणि चांदीचे दागिने, अलंकार किंवा नाणी यांच्या बदल्यात कर्ज देण्याची परवानगी आहे.
मात्र, बुलियन म्हणजे प्राथमिक स्वरूपातील सोने किंवा चांदीच्या बारच्या बदल्यात कर्ज देण्यास परवानगी नाही.
याव्यतिरिक्त, आधीच गहाण ठेवलेले सोने किंवा चांदी पुन्हा गहाण ठेवता येणार नाही.
सध्या अनेक मोठ्या बँका चांदीला 'तारण' म्हणून विचारात घेत नाहीत आणि त्यामुळे चांदीवर कर्ज देत नाहीत. मात्र, काही सहकारी बँका आणि एनबीएफसी चांदीवर कर्ज देतात.
बार किंवा म्युच्युअल फंडावर कर्ज मिळेल का?
आरबीआयच्या नियमांनुसार, बँक केवळ दागिने आणि नाणी यांवरच कर्ज देऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला चांदीचे बार, ईटीएफ, म्युच्युअल फंड इत्यादींवर कर्ज हवे असेल, तर त्यावर सध्या कर्ज मिळत नाही.
आजचे प्रमुख शहरांतील सोने-चांदीचे दर
| शहर | सोन्याचा भाव (१० ग्रॅम) रुपये | चांदीचा भाव (१ किलो) |
| पुणे | १,२२,४६० | १,५४,९०० रुपये |
| मुंबई | १,२२,४६० | १,५४,९०० रुपये |
| दिल्ली | १,२३,४२० | १,५४,९०० रुपये |
| चेन्नई | १,२३,२८० | १,६५,००० रुपये |
वाचा - पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
आज चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदीचा भाव सर्वात जास्त ₹१,६५,००० प्रति किलो आहे, तर पुणे, मुंबई आणि दिल्लीमध्ये तो ₹१,५४,९०० प्रति किलो आहे.
