RBI Repo Rate : सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! जे नागरिक नवीन कर्ज घेण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांचे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज सुरू आहे, त्यांच्यासाठी ईएमआय कमी होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले आहेत की, सध्याचे आर्थिक निर्देशांक रेपो दरात कपात करण्याची मोठी संधी दर्शवत आहेत.
एमपीसी बैठकीपूर्वी मोठा संकेत
पुढील महिन्यात ३ ते ५ डिसेंबर दरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीआधीच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, दरांमध्ये कपात करायची की नाही, याचा अंतिम निर्णय एमपीसीच्या बैठकीत घेतला जाईल. ऑक्टोबरच्या बैठकीतच दरांमध्ये कपातीचे संकेत देण्यात आले होते, त्यामुळे आगामी बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते जूनदरम्यान एमपीसीने सुमारे १०० बेसिस पॉइंटने दर कमी केले होते. मात्र, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला गेला होता.
दर कपातीसाठी अनुकूल वातावरण
दरात कपात होण्याची मोठी शक्यता निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे, ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई घटून ०.२५% या विक्रमी पातळीवर आली आहे, जी सप्टेंबरमध्ये १.४४% होती. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरच्या बैठकीत २५ बेसिस पॉइंटपर्यंत (०.२५%) दरात कपात होण्याची शक्यता आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, RBI चे पहिले उद्दिष्ट मूल्य स्थिरता राखणे आणि दुसरे उद्दिष्ट विकासाला समर्थन देणे आहे. त्यामुळे बँक ना तर आक्रमकपणे दर कमी करेल, ना पूर्णपणे बचावात्मक भूमिका घेईल.
वाचा - उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
रुपयाच्या घसरणीवर RBI चे मत
रुपयाच्या सातत्याने होणाऱ्या घसरणीबद्दल विचारले असता, गव्हर्नर म्हणाले की, ऐतिहासिकदृष्ट्या रुपयाचे मूल्य दरवर्षी सुमारे ३ ते ३.५% ने कमी होते. आरबीआयचे लक्ष्य रुपयाच्या चढ-उतारांना अधिकाधिक नियंत्रित ठेवणे आहे, जेणेकरून विनिमय दरातील अचानक बदलांमुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये.
