UPI Payment: आता भारतात वियरेबल स्मार्ट ग्लासेस वापरून UPI Lite सुविधेद्वारे पैसे दिले जाऊ शकतात. यासाठी युजर्सना फक्त क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि व्हॉइस कमांड द्यावी लागेल. एनपीसीआयनं (NPCI) मंगळवारी सांगितलं की, या सुविधेसाठी मोबाईल फोनची किंवा कोणताही पिन नंबर टाकण्याची गरज भासणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी येथे 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५' मध्ये या नवीन डिजिटल पेमेंट सुविधेची घोषणा केली.
छोट्या पेमेंटसाठी UPI Lite
'UPI Lite' खास करून छोट्या रकमेच्या वारंवार केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी विकसित केलं गेलं आहे. यात मुख्य बँकिंग प्रणालीवर अवलंबून राहणं खूप कमी होते. NPCI ने एक व्हिडीओ जारी करून सांगितलं की, स्मार्ट चष्म्याद्वारे UPI Lite नं पेमेंट करणे हे 'पाहा, बोला, पेमेंट करा' यासारखं खूप सोपं आहे. हे वैशिष्ट्य दैनंदिन पेमेंट जसे की रिटेल, फूड आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी (Retail, Food and Transportation) उपयुक्त आहे आणि डिजिटल पेमेंट अधिक सोपं व सिमलेस बनवतं.
वियरेबल क्षेत्रात UPI चा पहिला विस्तार
हा उपक्रम वियरेबल क्षेत्रात UPI चा पहिला विस्तार आहे आणि याला सोप्या प्रकारच्या पेमेंटच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. यामुळे बँक आणि पेमेंट सेवा पुरवठादारांना देखील फायदा होईल, कारण नॉन-सीबीएस (कोर बँकिंग प्रणाली) वॉलेट व्यवहार (Non-CBS Wallet Transactions) असल्यानं मुख्य बँकिंग प्रणालीवरचा ताण कमी होईल.
NPCI ने म्हटलं की, वियरेबल स्मार्ट ग्लासद्वारे UPI Lite पेमेंटची व्यवस्था भारताला ग्लोबल डिजिटल पेमेंट इनोव्हेशनमध्ये टॉप वर नेण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण उपक्रम असेल. देशातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली चालवणाऱ्या एनपीसीआयकडे युपीआयची मालकी आहे.