ज्या दिवशी धनादेश बँकेत भरला, त्याच दिवशी तो वटण्यासाठी उभारण्यात आलेली इमेज-आधारित ‘क्लीअरन्स प्रणाली’ स्थिरावली आहे, असं ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’नं (एनपीसीआय) म्हटलं आहे. ‘एनपीसीआय’नं म्हटलं की, नव्या क्लीअरन्स प्रणालीतील बहुतांश बँकांच्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. केंद्रीय प्रणाली सोमवारपासून स्थिर आहे. काही किरकोळ अडचणी सोडविण्यासाठी एनपीसीआय बँकांसोबत काम करीत आहे.
नवी प्रणाली झाली लागू
रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार, चेक क्लीअरन्स प्रणाली आता पूर्वीच्या बॅच प्रोसेसिंग (टी १) पद्धतीऐवजी सतत क्लीअरन्स प्रणाली (टी ०) वर कार्यरत आहे. ही नवी पद्धत ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाली आहे.
सुरुवातीला आल्या सॉफ्टवेअरच्या समस्या
भारतीय स्टेट बँकेसारख्या सरकारी बँकांसह अनेक बँकांना सुरुवातीला सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षणाच्या अडचणींना सामोरं जावं लागलं. बँका नव्या प्रणालीसाठी पुरेशा तयार नव्हत्या. त्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र, या समस्या आता सुटल्या आहेत.
“प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यात विलंब झाला. मात्र, बहुतांश समस्या आता सुटल्या आहेत," असं एनपीसीआयनं म्हटलंय.