Personal Loan : पर्सनल लोन हा शब्द आता आपल्या सवयीचा भाग झाला आहे. तुम्हालाही कधी ना कधी एखाद्या बँक प्रतिनिधीचा पर्सनल लोन घेण्यासाठी फोन आलाच असेल. आर्थिक आणीबाणीमध्ये पर्सनल लोन एखाद्या देवदुतापेक्षा कमी नाही. कारण, कमी कागपत्रांमध्ये झटपट कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात पर्सनल लोन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, दुसरीकडे त्याची काळी बाजूही तितकीच खरी आहे. अनेकजण वैयक्तिक कर्जाच्या मोठ्या व्याजाखाली दबल्याची उदाहरणेही कमी नाहीत. पर्सनल लोन हे सर्वात जास्त व्याजदर असलेले कर्ज मानले जाते, त्यामुळे तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतानाच ते घ्या. जर तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर या ६ चुका करू नका.
आली ऑफर घेतलं कर्ज..
अनेकदा ग्राहक एखाद्या बँकेने दिलेल्या ऑफरला आकर्षित होऊन लगेच कर्जासाठी अर्ज करतात. पण, ही चूक तुम्ही करू नका. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी, ग्राहकाने वेगवेगळ्या बँका आणि NBFC च्या वैयक्तिक कर्ज ऑफरची तुलना केली पाहिजे. अनेक बँका ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येतात. यामध्ये प्रोसेसिंग फीची पूर्ण किंवा आंशिक माफी, कमी व्याजदर, फोरक्लोजर फीमधून सूट, गिफ्ट व्हाउचर इ. तुम्हाला सर्वात जास्त फायदा दिसेल तिथून वैयक्तिक कर्ज घ्या.
अनावश्यक गोष्टींसाठी वैयक्तिक कर्ज
झटपट मिळतंय म्हणून पर्सनल लोन घेण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. लक्षात ठेवा वैयक्तिक कर्जाला सर्वाधिक व्याजदर असते. त्यामुळे योग्य कारणांसाठीच ही जोखीम उचलायची असते. वैयक्तिक कर्जाची रक्कम शेअर ट्रेडिंग, फँटसी स्पोर्ट्स गेम्स, सट्टेबाजी, जुगार इत्यादी चुकूनही वापरू नका.
आवश्यक तेवढचे कर्ज घ्या
बँका किंवा NBFC तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार वैयक्तिक कर्ज देतात. याचा अर्थ असा नाही की गरजेपेक्षा जास्त कर्ज घ्यावे. तुम्हाला कितीही जास्त कर्ज दिले जात असले तरीही तुम्हाला आवश्यक असलेल्या रकमेसाठीच वैयक्तिक कर्ज घ्या.
कर्जाचा हप्ता चुकवणे
तुम्ही कर्ज घेतल्यावर, तुमच्या खात्यात देय तारखेला पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा, EMI चुकणार नाही. वैयक्तिक कर्जात हप्ता चुकल्यास तुम्हाला दंड आकारला जातो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोरही घसरतो. तुम्ही ईएमआयची परतफेड करण्यास ९० दिवसांपेक्षा जास्त उशीर केल्यास, तुम्हाला डिफॉल्टर घोषित केले जाईल. ही डीफॉल्ट स्थिती तुमच्या क्रेडिट स्टोअरमध्ये वर्षानुवर्षे दिसून येईल.
कर्जाची मुदत विनाकारण वाढवणे
काहीवेळा ग्राहक आपल्या पर्सनल लोन रिस्ट्रक्चर करतात. यामध्ये, कर्जाचा कालावधी वाढवून EMI रक्कम कमी होते. यामुळे तुमचे कर्ज दीर्घकाळ चालू राहते. पण, यात तुम्हाला व्याज म्हणून मोठी रक्कम द्यावी लागेल. तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तरच ग्राहकांनी हा पर्याय निवडावा.
एकाच वेळी अनेक कर्ज उचलणे
काही लोक छोट्या गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घेतात. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडे अनेक वैयक्तिक कर्जे आहेत आणि त्यांना ईएमआय म्हणून मोठी रक्कम भरावी लागेल. यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.