RBI UDGAM Portal: अनेक लोकांना असं वाटतं की जर बँक खाते अनेक वर्षांपासून वापरलं नसेल, तर त्यातील पैसे संपले असतील. पण वास्तव हे आहे की बहुतांश प्रकरणांमध्ये पैसे सुरक्षित असतात, फक्त ते 'अनक्लेम्ड' (Unclaimed) श्रेणीत जातात. अशाच विसरलेल्या बँक खात्यांचा आणि जमा रक्कमेचा शोध घेण्यासाठी RBI चे UDGAM पोर्टल मदत करते. याद्वारे तुम्ही घरी बसून हे जाणून घेऊ शकता की तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावर कोणत्याही बँकेत पैसे पडून आहेत का.
UDGAM पोर्टल काय आहे आणि ते कशी मदत करते?
UDGAM चं पूर्ण नाव Unclaimed Deposits Gateway to Access Information असं आहे. हे एक केंद्रीकृत प्लॅटफॉर्म आहे, जिथे एकाच वेळी अनेक बँकांमधील अनक्लेम्ड डिपॉझिट्सची माहिती शोधली जाऊ शकते. पूर्वी यासाठी वेगवेगळ्या बँकांच्या शाखांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या, परंतु आता एकाच पोर्टलमुळे हे काम सोपं झालंय. अनेकदा योग्य शाखा शोधणे देखील कठीण व्हायचं, UDGAM ने ही अडचण बऱ्याच अंशी दूर केली आहे. मात्र, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की UDGAM फक्त माहिती देणारे पोर्टल आहे. यातून थेट पैसे काढता येत नाहीत. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या विहित प्रक्रियेतूनच जावं लागेल.
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
UDGAM पोर्टलवर तपासणी कशी करावी?
सर्वात आधी RBI च्या UDGAM पोर्टलवर जा. तिथे तुमचे नाव, जन्मतारीख यासारखी मूलभूत माहिती भरा. योग्य रिझल्टसाठी नावाची वेगवेगळी स्पेलिंग देखील वापरून पहा, कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नाव थोड्या वेगळ्या पद्धतीनं नोंदवलेलं असू शकतं. जर तुम्ही आई-वडील किंवा एखाद्या नातेवाईकाच्या खात्याचा शोध घेत असाल, तर जुन्या पासबुक किंवा एफडी (FD) पावतीवर लिहिलेलं नावच टाका. अनेकदा छोटासा बदल देखील सर्च रिझल्टवर परिणाम करू शकतो.
सर्चमध्ये नाव दिसल्यास पुढे काय करावं?
जर पोर्टलवर तुमच्या नावानं एखादी एन्ट्री दिसत असेल, तर त्याला अंतिम क्लेम समजू नका, तर तो एक संकेत माना. पुढचं पाऊल म्हणजे संबंधित बँकेशी संपर्क साधणं. बँक तुमच्याकडून केवायसी (KYC) कागदपत्रे मागेल आणि रेकॉर्डची पडताळणी करेल. खातेदार स्वतः क्लेम करत असेल तर प्रक्रिया सोपी असते, मात्र कायदेशीर वारसाच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे द्यावी लागू शकतात.
१० वर्षांपेक्षा जुन्या पैशांचे काय होते?
दीर्घकाळ क्लेम न केल्यास, बँका अशा जमा रकमा RBI च्या Depositor Education and Awareness Fund (DEAF) मध्ये वर्ग करतात. यामुळे अनेक लोक घाबरतात की कदाचित आता पैसे परत मिळणार नाहीत. मात्र, यामुळे तुमचा हक्क संपत नाही. खातेदार किंवा त्याचे वारस आजही बँकेमार्फत पैशांचा क्लेम करू शकतात. बँक पेमेंट करते आणि नंतर DEAF कडून ती रक्कम ॲडजस्ट करून घेते.
कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
UDGAM वर सर्च करताना घाई करू नका. नाव, आडनाव आणि इनिशिअल्स यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन टाकून पहा. जुना मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा पत्त्याची माहिती जपून ठेवा, कारण बँक ओळख पटवण्यासाठी याची पडताळणी करू शकते. अचूक माहिती आणि संयम असल्यास हे पोर्टल वर्षांनुवर्षे अडकलेले पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा करू शकते.
